… तर जशास तसे उत्तर दिले जाईल; राजनाथ सिंह यांचा चीनला कठोर शब्दात इशारा


लडाख – आज लेहचा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दौरा करत तेथील परिस्थितीचा आढावाही घेतला. त्यानंतर जवानांना राजनाथ सिंह यांनी संबोधित करताना चीनला कठोर शब्दात इशारा दिला. जगातील कोणतीही ताकद भारताच्या एक इंचही जमिनीला हात लावू शकणार नसल्याचे ते यावेळी म्हणाले. आज जवानांशी त्यांनी संवाद साधला आणि त्यांचे मनोबलही वाढवले.

भारताच्या स्वाभिमानावर जर कोणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर ते आम्ही सहन करणार नाही आणि त्यांना योग्य भाषेत उत्तरही दिले जाईल. भारत आणि चीनदरम्यान सध्या जी काही चर्चा झाली ती सकारात्मक आहे. या प्रकरणाचा तोडगा निघाला पाहिजे. पण हा तोडगा कुठपर्यंत निघेल याची सध्या कोणतीही हमी मी आता देऊ शकत नसल्याचे ते लडाखमधील लुकुंग चौकीवर भारतीय लष्कराच्या जवानांना संबोधित करताना म्हणाले.

जगातील कोणतीही ताकद भारताच्या एक इंचही जमिनीला हात लावू शकणार नाही किंवा त्यावर कब्जा करूही शकणार नाही याची मी शाश्वती देत असल्याचे ते यावेळी म्हणाले. आम्हाला अशांतता नाही तर शांतता हवी आहे. कोणत्याही देशाच्या स्वाभिमानावर भारताने कधी हल्ला केला नाही. पण भारताच्या स्वाभिमानावर जर कोणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर ते सहन केले जाणार नाही. त्यांना जशास तसे उत्तर देण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.