21 जुलैला राज्यातील दूध संकलन बंद


कोल्हापूर – राज्यातील अनेक व्यवसाय कोरोनाच्या या संकटकाळात अचडणीत सापडले आहेत. त्यामध्ये दूध व्यवसाय हा सुद्धा मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडला आहे. दूधाची मागणी कोरोना आणि लॉकडाऊनमूळे 15 ते 20 टक्क्यांपर्यत घसरल्यामुळे दूधाचे दर कमी झाले आहे. परिणामी दूध उत्पादक शेतकऱ्यांना कमी दर तसेच वेळेत पैसे मिळण्यास अडचणी निर्माण होत आहे.

10 रुपये प्रती लिटर दूधावर राज्यसरकारने शेतकऱ्यांना अनुदान द्यावे किंवा 30 रुपये प्रतिलिटर दराने दूधाची खरेदी करावी अशी मागणी करण्यात आली आहे. राज्यातील सर्व दूध संकलन राज्य आणि केंद्र सरकारला जाग आणण्यासाठी 21 जुलैला बंद करण्यात येणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.

दूधावरील जीसटी मागे सरकारने घ्यावा, दूध उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने 5 रूपये अनुदान द्यावे. केंद्र सरकारने बफर स्टॉक करावा, तसेच दूधाला 30 रुपये भाव द्यावा यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे. कुणालाही आम्ही जबरदस्ती करत नाही; पण आम्हाला आमचे दूध विकायचे नाही, आम्हाला आमचे दूध संकलन करायचे नाही. ही आमची भूमिका आहे. दूध उत्पादकांनी आम्हाला सहकार्य करावे. कारण दूध उत्पादकाच्या जीवावर तुमचा धंदा चालतो आहे, याचे भान ठेवा. दूध संघानीही आपले दूध संकलन बंद ठेवावे आणि सहकार्य करावे, असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले आहे.