स्पेनिश संशोधकांचा दावा ; कोरोनाच्या लक्षणात आणखी एका नव्या लक्षणाची वाढ


नवी दिल्ली – जगभरात सध्या कोरोना व्हायरसची दहशत पसरली असून ही दहशत आता आणखीनच टोकाला पोहचली असल्यामुळे जगभरातील नागरिकांमधील भिती वाढत आहे. त्याचबरोबर या व्हायरसचा समूळ नाश करण्यासाठी ज्या प्रकारे संशोधन होत आहे. त्याचप्रमाणे या व्हायरसमधील नवीन संभाव्य लक्षणे देखील समोर येत आहेत. या संदर्भात स्पेनिश संशोधकांनी केलेल्या संशोधनानुसार कोरोनाबाधित रुग्णांच्या तोंडात रॅशेस दिसतात.

दरम्यान कोरोनाच्या लक्षणांमधील हे संभाव्य लक्षण असून त्यावर अजून अभ्यास करण्याची गरज असल्याचे मत या संशोधकांनी व्यक्त केले आहे. पण मात्र त्वचेवरील रॅशेस सोबतच enanthem म्हणजेच तोंडातील नाजूक त्वचेवर दिसणारे रॅशेस देखील कोरोनाचे संकेत देतात असा निष्कर्ष आता पुढे येत आहे.

दरम्यान 15 जुलै रोजी JAMA Dermatology ने प्रकाशित केलेल्या एका अहवालामध्ये कोरोनाच्या नव्या लक्षणाची माहिती देण्यात आली आहे. संशोधकांच्या मते enanthem हे कोरोनाचे लक्षण असू शकते. तोंडातील नाजूक त्वचेवर येणार्‍या रॅशेसला क्लिनिकल भाषेमध्ये enanthem म्हणतात. हे लक्षण कोरोनासारख्या व्हायरल इंफेक्शनमध्ये दिसू शकते.

स्पेनच्या माद्रिदमधील University Hospital Ramon y Cajal येथे Dr. Juan Jimenez-Cauhe यांनी 21 कोरोनाबाधितांची पाहणी केली. या 6 रूग्णांच्या तोंडात अशा प्रकारचे रॅशेस आढळले. दरम्यान या रूग्णांचे वय 40 ते 69 दरम्यान होते. त्याचबरोबर ज्या रूग्णांमध्ये रॅशेस आढळले त्यापैकी 4 महिला असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. या निष्कर्षानंतर या लक्षणाबद्दल आता अधिक सखोल अभ्यास करण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. रूग्णांच्या तोंडात रॅश दिसण्याचा कालावधी आणि स्वरूप वेगवेगळे असू शकते. enanthem हे कोरोनाच्या रूग्णाला दिल्या जाणार्‍या औषधाची रिअ‍ॅक्शन नसल्याचे या अहवालात स्पष्ट झाले आहे.

वरील बाबी संशोधनातून सिद्ध झालेल्या असून त्या केवळ माहिती म्हणून आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यासंदर्भातील पुष्टी अथवा दावा माझा पेपर करत नाही.