कोरोना संकटातही चीनची ‘मिशन मंगळ’ची तयारी

कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणामध्येही आता चीन मंगळ ग्रहावर आपले रोव्हर पाठविण्याच्या तयारीत आहे. तियानवेन-1 नावाच्या या मिशनला चीन जुलै-ऑगस्ट महिन्यात हेनान प्रांतातील वेंचांग स्पेस लाँच सेंटरवरून पाठवणार आहे. चीन व्यतिरिक्त अमेरिका आणि यूएईने देखील मंगळ ग्रहाच्या मिशनची घोषणा केली आहे.

तियानवेन-मिशनमधील रोव्हरला चीन आपल्या सर्वात शक्तीशाली रॉकेट लाँग मार्च-5 द्वारे पाठवणार आहे. या रॉकेटचे तीन वेळा यशस्वी परीक्षण करण्यात आले आहे. मात्र तिन्ही वेळ यावर कोणतेही वजन नव्हते. चीनने या आधी 2011 मध्ये मंगळ ग्रहबाबत एक मिशन लाँच केले होते. यात त्यांनी रशियाची मदत घेतली होती, मात्र हे मिशन अयशस्वी झाले होते.

चीनच्या या अभियानाला त्यांच्या अंतराळ कार्यक्रमात सर्वाधिक महत्वकांक्षी मानले जात आहे. देश कोरोना संकटात अडकला असताना देखील चीन या अभियानाची तयारी करत आहे. यात यश मिळाल्यास चीनचे हे पहिले मंगळ मिशन असेल.