भाजपने दाखवून दिली नारायण राणेंची खरी जागा; म्हणून कार्यकारिणीतही नाही घेतले


मुंबई: शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी बोलताना त्यांनी नारायण राणे यांच्यावर सडकून टीका केली. नारायण राणे यांची सध्याची स्थिती म्हणजे ‘ना घर का ना घाट का’ अशी झाली असून त्यांना राज्य कार्यकारिणीतही भाजपने स्थान दिलेले नाही. त्याचबरोबर राणेंना या माध्यमातून भाजपने त्यांची जागा दाखवून दिली आहे, अशी टीका त्यांनी केली. तसेच केवळ बोलघेवडेपणाचे नारायण राणे यांचे काम आहे. जसे कावीळ झालेल्याला सगळे जगच पिवळे दिसते, तसेच त्यांना शिवसेनेबद्दल द्वेष, उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मत्सर या भावनेने पछाडलेले आहे. राज्य कार्यकारिणीत स्थान न देऊन भाजपनेही नारायण राणे यांना त्यांची जागा दाखवून दिल्याचे राऊत यांनी म्हटले.

नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही पूत्र गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. उद्धव ठाकरे मातोश्रीच्या बाहेर पडत नसल्यामुळे राज्यातील अधिकाऱ्यांवर सरकारचा वचक राहिलेला नाही. सध्या कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती उद्धव ठाकरे यांना हाताळता येत नसल्यामुळे मुंबईसारख्या जागतिक दर्जाच्या शहराची दुर्दशा झाली आहे. राज्यात अन्यत्रही हीच परिस्थिती असल्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, असे नारायण राणे यांनी म्हटले होते.