धक्कादायक! शेकडो नाराज कोरोनाग्रस्तांनी कोव्हिड सेंटरमधून बाहेर पडत रस्ता केला ब्लॉक

देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत चालला आहे. आरोग्य व्यवस्थेवर देखील अधिक दबाव आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्त व्यक्तीला याचे परिणाम भोगावे लागत आहेत. आसामच्या कामरूप जिल्ह्यातील कोरोना रुग्ण एवढे भडकले की त्यांनी कोव्हिड केअर सेंटरमधून बाहेर पडत राष्ट्रीय महामार्ग 31 बंद पाडला. या रुग्णांचा आरोप आहे की त्यांच्या खाण्या-पिण्याची योग्य व्यवस्था करण्यात आलेली नाही.

रुग्णांचा आरोप आहे की, त्यांना जेवण आणि पाणी उपलब्ध नाही. बेड्सची स्थिती देखील चांगली नाही. एका रुममध्येच 10-12 रुग्णांना ठेवण्यात आले आहे. त्यामुळे जवळपास 100 नाराज कोरोना रुग्णांनी बाहेर पडत राष्ट्रीय महामार्ग ब्लॉक केला.

यानंतर कामरुपचे उपआयुक्त कैलाश कार्तिक पोलिसांसह तेथे पोहचले. त्यांनी रुग्णांना रस्त्यावरून बाजूला होण्यास आणि सेंटरमध्ये परत येण्यास सांगितले. आश्वासन दिल्यानंतर आता रुग्ण सेंटरमध्ये परतत आहेत. उपआयुक्तांनी त्यांना आश्वासन दिले की, त्यांच्या आरोपांवर लक्ष दिले जाईल व यातून मार्ग काढला जाईल.

या प्रकरणावर राज्याचे आरोग्य मंत्री हेमंत बिस्व शर्मा म्हणाले की, रुग्ण कोव्हिड सेंटरच्या फॅसिलिटीमुळे खूश नसतील तर त्यांच्याकडे होम क्वारंटाईनचा देखील पर्याय आहे. आरोग्य कर्मचारी दिवस-रात्र काम करत आहेत, त्यांच्यावर कामाचे ओझे आहे. अशा स्थिती काही वेळ उशीर होऊ शकतो. अन्य राज्यात टेस्टिंगचे देखील पैसे घेतात. मात्र आसाममध्ये टेस्टिंगपासून खाण्या-पिण्यापर्यंत सर्व खर्च राज्य सरकार करते.