कौतुकास्पद! शेतकऱ्याच्या मुलाला 12वीत मिळाले 98%, आता अमेरिकेत शिक्षणाची संधी

उत्तर प्रदेशच्या एका गावातील शेतकऱ्याच्या मुलाला 12वीमध्ये 98.2 टक्के गुण मिळवत एक उदाहरण समोर ठेवले आहे. शेतकऱ्याच्या मुलाच्या या कामगिरीने त्याच्यासाठी आता परदेशात शिक्षणाचे दरवाजे उघडले आहेत. अनुराग तिवारी या विद्यार्थ्याने ही कामगिरी केली आहे. त्याला आता अमेरिकेच्या प्रतिष्ठीत आयव्ही लीग यूनिव्हर्सिटीमध्ये स्कॉलरशिपच्या माध्यमातून अ‍ॅडमिशनची संधी मिळाली आहे. त्याने सांगितले की, त्याची अमेरिकेच्या कॉर्नेल यूनिव्हर्सिटीमध्ये निवड झाली आहे. तेथे तो अर्थशास्त्रामध्ये उच्च शिक्षण घेणार आहे.

सीबीएसईद्वारे जाहीर करण्यात आलेल्या निकालात ह्युमॅनिटीजचा विद्यार्थी असलेल्या अनुरागला गणितात 95, इंग्रजीत 97, राज्यशास्त्र 99 आणि इतिहास व अर्थशास्त्रात 100 गुण मिळाले आहेत. अनुराला सॅट परिक्षेत 1,370 गुण मिळाले असून, याचा वापर अमेरिकेच्या प्रमुख कॉलेजमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी केला जातो.

अनुरागने सांगितले की, हा प्रवास सोपा नव्हता. घरची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने अभ्यासासाठी सीतापुर जिल्ह्यातील विद्यालयात जावे लागले होते. अनुरागचे वडील शेतकरी आहेत, तर आई गृहिणी आहे. त्याच्या बहिणींनी त्याला शिकण्याची परवानगी दिली.

परदेशात शिक्षणाबद्दल त्याने सांगितले की, माझ्या शिक्षकांनी मला आयव्ही लीग कॉलेजमध्ये प्रवेशासाठी प्रयत्न करण्याचा सल्ला दिला परदेशात शिक्षण घेणे एक चांगला पर्याय आहे. त्यामुळे मी कॉर्नेल यूनिव्हर्सिटीमध्ये अर्ज केला व सॅट परीक्षा दिली. तो फेब्रुवारी 2021 ला अमेरिकेला शिक्षणासाठी जाणार आहे. शिक्षणानंतर भारतात परतून येथील शिक्षण क्षेत्रात योगदान देईल, असेही तो म्हणाला.