सुशांतच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी करा, रियाची अमित शाहांकडे मागणी - Majha Paper

सुशांतच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी करा, रियाची अमित शाहांकडे मागणी

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी वारंवार केली जात आहे. अनेक नेते आणि कलाकारांनी यासंबंधी मागणी केली होती. आता सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने ट्विट करत गृहमंत्री अमित शाह यांना या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी केली आहे.

रियाने दोन ट्विट केले. त्यात तिने लिहिले की, आदरणीय अमित शाह सर, मी सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आहे. त्याच्या अचानक झालेल्या मृत्यूला 1 महिन्यापेक्षा अधिक दिवस झाले. मला सरकारवर विश्वास आहे. मात्र न्यायासाठी मी हात जोडून विनंती करते की या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी.

रियाने आणखी एक ट्विट करत म्हटले की, मी हात जोडून विनंती करते की या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी. मला एवढेच जाणून घ्यायचे आहे की असा कोणता दबाव होता, ज्याने सुशांतला हा निर्णय घेण्यास भाग पाडले.

दरम्यान, सुशांतच्या आत्महत्येनंतर रियाला बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमकी मिळत आहेत. या संदर्भात कारवाई करावी असे तिने सायबर सेलला केली आहे.