कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेजुरीच्या खंडोबाची सोमवती यात्रा रद्द - Majha Paper

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेजुरीच्या खंडोबाची सोमवती यात्रा रद्द


पुणे – येत्या सोमवारी म्हणजे २० जुलैला महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबाची यात्रा आहे. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेजुरीच्या खंडोबाची सोमवती यात्रा रद्द करण्याचा निर्णय ग्रामस्थ-मानकरी मंडळाच्या बैठकीत जाहीर करण्यात आला. पण दरवर्षीप्रमाणे वाजत-गाजत पालखी खांद्यावर घेऊन कर्‍हा समात्र नित्य सेवेकरी, मानकरी यांच्या हस्ते खंडोबाचे सर्व धार्मिक विधी पार पडणार आहेत. धार्मिक विधी प्रशासनाच्या सुचनांचे काटेकोर पालन करून करणार असल्याचे ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष गणेश आगलावे यांनी सांगितले आहे.

जेजुरी शहर व परिसर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्यावतीने कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. जेजुरी शहर १४ दिवस पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आले आहे. कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. त्या अनुषंगाने जेजुरी येथील सोमवती यात्रा उत्सव रद्द करण्यात आला. शिवाय, परंपरेनुसार कर्‍हास्नानासाठी गडावरुन प्रस्थान होणारा पालखी सोहळाही रद्द करण्यात आला आहे.

सोमवती उत्सवाचे सर्व धार्मिक विधी नित्य सेवेकरी, पुजारी, मानकरी यांचे हस्ते पार पडणार आहेत. सोमवारी खंडोबा-म्हाळसादेवीची उत्सवमूर्ती सजवण्यात आलेल्या चार चाकी वाहनातून कर्‍हा नदीवर नेण्यात येणार आहेत. त्याठिकाणी सुरक्षित अंतर ठेवून मूर्तींना अभिषेक, स्नान घालण्यात येणार आहे. दरम्यान, ग्रामस्थांना ‘रोजमुरा’ (ज्वारी) घरपोच वाटप करण्यात येणार आहे. त्याचबरोबर भाविकांना देवदर्शन बंद करण्यात आल्यामुळे सोमवती यात्रेनिमित्त भाविकांनी शहरात येऊ नये, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी सांगितले.