… म्हणून युवक चालवत होता चक्क विना टायरची गाडी

जर तुम्ही ड्रायव्हिंग शिकत असाल तर टायर कसा बदलावा हे देखील नक्की शिका. कारण याची माहिती नसल्यास, तुम्ही कधीही मोठ्या अडचणीत सापडू शकता. अनेकजण चारचाकी वाहनांचे टायर पंचर झाल्यानंतर मदतीसाठी फोन करतात. मात्र ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न येथील एका युवकाने पुढचा टप्पा गाठला आहे. त्याने गाडीचा टायर पंचर झाल्यानंतरही तो बदलण्याऐवजी तसाच गाडी चालवत राहिला.

टायर पंचर झाल्यानंतरही गाडी चालवल्याने चाकाचे रिम दिसू लागले व अखेर गाडी एका ठिकाणीच अडकली. पोलिसांनी पकडल्यावर अखेर युवकाला मोठा दंड ठोठावला.

मेलबर्न येथील विक्टोरिया पोलिसांनी 14 जुलैला सकाळी 3 वाजता यारा रोडावरील एका लेनला ब्लॉक करणारी निसान पल्सर कार पाहिली. पोलिसांना गाडी रस्त्यात का उभी आहे याचे कारण समजल्यावर त्यांना देखील धक्का बसला. पोलिसांनुसार, 19 वर्षीय चालकाने सांगितले की त्यांच्या गाडीचा टायर पंचर झाला आहे. त्याला व त्याच्या मित्राला टायर कसा बदलायचा हे माहित नव्हते. त्यामुळे ते तसेच कार चालवत राहिले.

दोघेही नशेत असल्याचे देखील आढळले. यानंतर पोलिसांनी कारवाई करत चालकाचे लायसन्स 12 महिन्यांसाठी रद्द केले. ड्रिंक अँड ड्राईव्हमुळे त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल होण्याची शक्यता आहे. तसेच लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याने त्यांना प्रत्येकी 1652 डॉलर्स (जवळपास 1.24 लाख रुपये) दंड ठोठावण्यात आला.