मोदी आणि भाजपमुळेच निवडून आले शिवसेनेचे खासदार-आमदार


मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखती दरम्यान भाजप व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नामोल्लेख न करता टीका केली होती. विशेषतः पवार यांनी मी पुन्हा येईन या फडणवीस यांच्या घोषवाक्यावरही भाष्य केले होते. आता त्याच सामनाच्या मुलाखतीच्या तीन दिवसांनंतर भाजप खासदार नारायण राणे यांनी टीका केली आहे.

आज नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी बोलताना राणे म्हणाले, कोरोनामुळे देशात व जगात हाहाकार झाल्याचा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण या कोरोनामुळे महाराष्ट्रातील परिस्थिती भयावह आहे. कोरोनावर मात करण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात याविषयी शरद पवारांच्या मुलाखतीत मार्गदर्शन केले असते, तर मी समजले असतो की ही भीमटोला मुलाखत यशस्वी झाली. सामनातून जितकी टीका शरद पवारांवर झाली, तितकी कोणत्याही वर्तमानपत्रातून आजवर झाली नसेल. शरद पवारांविषयी मला आदर आहे, पण सामनातील ही मुलाखत हेच राजकारण असल्याची टीका राणे यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्यावर मुलाखतीतून टीका करण्यात आली. सत्तेचा दर्प चालत नाही, लोक पराभूत करतात, हे कोणाला उद्देशून होते. तुम्ही नाव का घेत नाही. पण देवेंद्र फडणवीस यांना हे उद्देशून होते. फडणवीस हे घमेंड करणारे, गर्व करणारे व्यक्ती नाहीत. त्यांना सत्तेवर असताना मुख्यमंत्री पदाची मस्ती आली, असे एकही उदाहरण कुणी सांगू शकत नसल्यामुळे त्यावेळी प्रचारात त्यांनी मी पुन्हा येईन, असे म्हटले असेल. यात कोणताही घमेंड अथवा गर्व नाही, ते घोषवाक्य आपल्या कार्यकर्त्यांना आत्मविश्वास देण्यासाठी होते. त्याचबरोबर पाच वर्षे मी यशस्वी काम केल्यामुळे लोक मला निवडून देणार, तो विश्वास त्यांनी त्यातून व्यक्त केला होता.

मग असे काय शरद पवार यांना दिसावे, त्यामुळे ही हेडिंग बरोबर नाही, असे पवारांना वाटले. शिवसेनेचे १०५ आमदारांमध्ये योगदान काय. शिवसेनेचे २०१४ मध्ये खासदार, आमदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे निवडून आले. मोदी आणि भाजपमुळे २०१९ मध्येही शिवसेनेचे खासदार-आमदार निवडून आले. आता हे तिघे एकत्र आले, यांचे आश्चर्य आहे. काही नेत्यांच्या तोंडून शिवसेना जातीयवादी पक्ष असल्याचे मी ऐकले होते. मग आता कशामुळे एकत्र आले. ते जनतेला समजून सांगितले असते, तर खूप बरे झाले असते, असे राणे म्हणाले.