महाविकास आघाडीच्या जाहिरातीवर काँग्रेस नेत्याचे प्रश्नचिन्ह


मुंबई – राज्यातील सत्ताधारी शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये सुरु असलेल्या कुरबुरी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत. भूमिपुत्रांच्या रोजगारासाठी राज्य सरकारने नुकत्याच सुरू केलेल्या महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीवरून काँग्रेस नाराज झाली आहे. केवळ शिवसेना व राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्याच फोटोंना महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीत स्थान देण्यात आल्यामुळे ही योजना महाविकास आघाडी सरकारची आहे की, शिवसेना-राष्ट्रवादीची?, असा सवाल काँग्रेस इतर दोन्ही मित्र पक्षांना केला आहे.

सत्तेत काही दिवसांपूर्वी सहभागी झालेला काँग्रेस पक्ष नाराज असल्याच्या चर्चेने फेर धरला होता. पण त्यावर नंतर पडदा पडला. त्यातच ही चर्चा थांबत नाही, तोच महाविकास आघाडीतील काँग्रेसने पुन्हा एकदा इतर दोन्ही पक्षांवर नाराजी व्यक्त केली आहे. ही नाराजी युवक काँग्रेसचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी ट्विट करून बोलून दाखवली आहे. काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या महाजॉब्स पोर्टलची नुकतीच एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पण या जाहिरातीत केवळ शिवसेना व राष्ट्रवादीचे नेते असून, त्यावर काँग्रेसने प्रश्न उपस्थित केला आहे.

महाजॉब्स ही योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची आहे की, शिवसेना-राष्ट्रवादीची? आघाडीचे गठन होत असताना, ठरलेल्या किमान समान कार्यक्रमाची व त्यातील शिष्टाचारांची अंमलबजावणी का होत नाही? हा माझ्यासारख्या सामान्य काँग्रेस कार्यकर्त्याला पडलेला प्रश्न असल्याचे ट्विट करत सत्यजीत तांबे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.