कोरोना : दुबईच्या हॉस्पिटलची माणुसकी, भारतीय व्यक्तीचे 1.52 कोटींचे बिल केले माफ

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. या आजारामुळे आतापर्यंत लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. या स्थितीमध्ये हॉस्पिटल नागरिकांवर लाखो रुपयांचे बिल थोपवत आहे. मात्र एका हॉस्पिटलने माणुसकी दाखवत एका व्यक्तीचे तब्बल 1.52 कोटी रुपयांचे पुर्ण बिल माफ केले आहे. दुबईमधील एका हॉस्पिटलने तेलंगानाच्या व्यक्तीचे बिल माफ केले आहे. विशेष बाब म्हणजे भारतात परत पाठविण्यासाठी विमानाचे मोफत तिकिट आणि 10 हजार रुपये देखील दिले.

तेलंगानाच्या जगीताल येथे राहणाऱ्या 42 वर्षीय ओदनला राजेश कोरोनाची लागण झाल्याने 23 एप्रिलला दुबईच्या हॉस्पिटलमध्ये भरती झाले होते. जवळपास 80 दिवस त्यांच्यावर उपचार केल्यानंतर ते बरे झाले. मात्र राजेश यांना हॉस्पिटलचे 7,62,555 दिरहम (जवळपास 1 कोटी 52 लाख रुपये) बिल भरणे शक्य नव्हते.

दुबईमध्ये गल्फ वर्कर्स प्रोटेक्शन सोसायटीचे अध्यक्ष गुंदेली नरसिम्हा हे राजेशला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले होते. त्यांनी राजेशची परिस्थिती दुबईतील भारतीय दूतावासाचे अधिकारी सुमनाथ रेड्डी यांच्यासमोर ठेवली. यानंतर हॉस्पिटल व्यवस्थापनाला पत्र लिहित मानवतेच्या आधारावर बिल माफ करण्याची विनंती केली

हॉस्पिटलने देखील माणुसकी दाखवत त्यांचे पुर्ण बिल माफ केले. याशिवाय राजेश आणि त्यांच्या एका सहकार्याला भारतात येण्यासाठी मोफत विमान तिकिट आणि 10 हजार रुपये देखील दिले.