कोरोनामुळे माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचे निधन


मुंबई – कोरोनाची लागण झाल्यामुळे महाराष्ट्राच्या माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचे निधन झाले आहे. त्यांना सेव्हन हिल्स रुग्णालयात कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती उपचारादरम्यान बिघडल्याने पहाटे चार वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती मिळत आहे. नीला सत्यनारायण यांची निवृत्त सनदी अधिकारी आणि महाराष्ट्राच्या पहिल्या स्त्री निवडणूक आयुक्त म्हणून ओळख होती. १९७२ आयएएस बॅचच्या नीला सत्यनारायण सनदी अधिकारी होत्या.

लोकप्रिय सनदी अधिकारी म्हणून नीला सत्यनारायण यांची ओळख तर होतीच. पण आपल्या रुक्ष आणि अतिशय धकाधकीच्या कामात व्यग्र असतानाही त्यांनी आपली संवेदनशीलता जोपासली होती. त्या नेहमी लेखनातून व्यक्त होत राहिल्या. कवयित्री म्हणून त्या अधिक परिचित असल्या, तरी त्यांचे स्तंभलेखनही अनेकांना आवडत होते. हिंदी, मराठी, इंग्रजी या तिन्ही भाषांमधून नीला सत्यनारायण यांनी पुस्तके लिहिली. याशिवाय १५० हून अधिक कविता लिहिल्या. त्यांच्या काही पुस्तकांवर चित्रपटदेखील तयार करण्यात आले. याशिवाय त्यांनी काही मराठी आणि हिंदी चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन केले होते. नीला सत्यनारायण यांनी सनदी अधिकारपदाच्या ३७ वर्षांच्या कारकिर्दीत मुलकी खाते, गृहखाते, वनविभाग, माहिती आणि प्रसिद्धी, वैद्यक आणि समाजकल्याण, ग्रामीण विकास यासारख्या अनेक खात्यांत सनदी अधिकारी म्हणून काम केले.