‘धोनीने त्यावेळी जे केले ते कधीच विसरणार नाही’

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी आणि माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन या दोघांमध्ये चांगली मैत्री आहे. दोघांनीही भारताला 28 वर्षानंतर वर्ल्डकप जिंकून देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. कर्स्टन आजही स्वतःला धोनीचा फॅन समजतात. एकदा गॅरी कर्स्टन नसल्याने धोनीने संपुर्ण संघाची ट्रिप रद्द केली होती. याची माहिती स्वतः कर्स्टन यांनी दिली आहे.

युट्यूबवर एक व्हिडीओ शेअर करत गॅरी म्हणाले की, धोनीची निष्ठा त्याला खास बनवते व आजपर्यंत त्याच्या सारखा व्यक्ती बघितला नाही. धोनी संघाबाबत खूप विचार करत असे व एक लीडर म्हणून देखील तो शानदार होता.

त्यांनी सांगितले की, वर्ल्डकप आधी भारतीय संघाला बंगळुरूच्या फ्लाइट स्कूलमध्ये जाण्याचे आमंत्रण मिळाले होते. मात्र सुरक्षेच्या कारणामुळे टीमच्या कोचिंग स्टाफमध्ये असलेल्या परदेशी व्यक्तींना जाण्यास परवानगी नव्हती. मला, पॅडी उप्टन आणि एरिक सिम्नसला जाण्याची परवानगी मिळाली नाही. ज्या दिवशी संघ जाणार होता, त्यावेळी धोनीला याची माहिती मिळाली. यामुळे धोनीने संपुर्ण संघाचीच ट्रिप रद्द केली हे मी कधीच विसरू शकत नाही. त्याने म्हटले होते की, आम्ही तिघे देखील संघाचा भाग आहोत व त्यांचे कुटुंब आहे. जर तुम्हाला परवानगी नाही मिळाली, तर कोणीच जाणार नाही.

गॅरी यांनी पुढे सांगितले की, धोनी त्यांच्यासोबत खूप वेळ घालवत असे. जेव्हा संघ हारत असे, त्यावेळी तो संघाला पुढे कसे न्यायचे याविषयी बसून बोलत असे.