बिल गेट्स यांची स्तुतिसुमने; भारत हा एकमेव देश आहे, ज्याच्याकडे जगाला कोरोनाची लस पुरवण्याची क्षमता


नवी दिल्ली – सध्या संपूर्ण जगावर कोरोना या जीवघेण्या आजाराचे संकट ओढावलेले आहे. याच रोगाचा बिमोड करण्यासाठी जगभरातील असंख्य शास्त्रज्ञ अहोरात्र झटत आहेत. त्यातच काही देशांनी याबाबत दिलासादायक बातमी दिली आहे. रशिया, अमेरिका यांसारख्या देशांना सुरूवातीच्या टप्प्यात यात यशही मिळाले आहे.
इतर देशांप्रमाणे भारतातील शास्त्रज्ञ देखील अहोरात्र मेहनत करून लस विकसित करण्याचे काम करत आहे. अशातच पुन्हा एकदा मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी भारतावर स्तुतिसुमने उधळली आहेत. भारतातील औषध उद्योग केवळ आपल्या देशासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी कोरोनावरीस लस तयार करण्यास सक्षम आहे. कोरोनाची लस विकसित करण्यासाठी भारतीय औषध कंपन्या एक महत्त्वपूर्ण कार्य करत असल्याचे बिल गेट्स म्हणाले.

मोठ्या आकाराचा आणि अधिक लोकसंख्या असलेला भारत हा देश असल्यामुळे या संकटात मोठ्या आव्हानाचा सामना भारताला करावा लागत असल्याचे गेट्स यावेळी म्हणाले. बिल गेट्स यांनी भारताच्या प्रयत्नांचे ‘COVID-19: India’s War Against The Virus’ या डिस्कव्हरीवरी प्लस वाहिनीवरील एका डॉक्युमेट्रीमध्ये कौतुक केले आहे. भारतात औषधे आणि लस तयार करणाऱ्या अनेक कंपन्या आहेत, ज्या संपूर्ण देशाला मागणीनुसार पुरवठा करू शकतात. त्याचबरोबर भारतात सर्वाधिक लसींची जगाच्या तुलनेत निर्मिती होते हे आपल्याला माहितच आहे. यात सीरम इन्स्टीट्युट आघाडीवर असल्याचेही त्यांनी नमूद केले.

बायो ई आणि भारत बायोटेकसारख्या अन्य कंपन्यादेखील भारतात आहेत. या कंपन्या देखील कोरोनाची लस तयार करण्यासाठी सध्या अहोरात्र काम करत असल्याचे ते म्हणाले. जागतिक पातळीवर लस निर्माण करणाऱ्या देशांच्या समुहात भारत सामिल झाला आहे. भारतातील औषध उद्योग केवळ भारतासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी औषधांचे उत्पादन करण्यास सक्षम असेल. त्यामुळे आपल्याला मृत्यूंची संख्या आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासही मदत मिळणार आहे. अशा प्रकारे आपण ही महामारी संपवू शकतो, असेही गेट्स यांनी स्पष्ट केले.