चीनची मूजोरी कायम; ‘फिंगर फोर’वरुन मागे हटण्यास नकार


नवी दिल्ली – भारतीय आणि चिनी सैन्यामध्ये पूर्व लडाखमधील नियंत्रण रेषेजवळ पुन्हा एकदा तणाव वाढू शकतो. सध्या तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरु आहेत. भारतीय आणि चिनी सैन्य पूर्व लडाखमध्ये एकूण चार ठिकाणी आमने-सामने आले होते. त्यातील तीन ठिकाणांहून चिनी सैन्यांने माघार घेतली, पण पँगाँग टीएसओ तलाव क्षेत्राजवळील फिंगर ४ वरुन मागे हटण्यास चीनने नकार दिला आहे. या संदर्भातील वृत्त झी न्यूजने दिले आहे.

चीनच्या या हट्टी भूमिकेमुळे पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी पेटू शकते. भारतीय लष्कराने चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने कुठलीही आक्रमकता दाखवल्यास त्यांना लगेच प्रत्युत्तर देण्यासाठी पूर्व लडाखच्या सीमेवर रणगाडयांची तैनाती वाढवली आहे. त्याचबरोबर चीनकडून असलेला धोका अद्याप कायम असल्यामुळे भारतीय लष्कर पूर्णपणे हायअलर्टवर आहे.


या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह १७ आणि १८ जुलैला लडाख, जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. उत्तर कमांडचे लेफ्टनंट जनरल वाय.के.जोशी दिल्लीत दाखल झाले आहेत. लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन ते नियंत्रण रेषेजवळील परिस्थितीची माहिती देतील.

तब्बल १५ तास चर्चा कॉर्प्स कमांडरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये झाली. मंगळवारी सकाळी सुरु झालेली ही बैठक बुधवारी मध्यरात्री संपली. फिंगर ४ वरुन मागे हटणार नसल्याचे चिनी सैन्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्याचे या बैठकीत सांगण्यात आले आहे. झी न्यूजने हे वृत्त सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. भारत आणि चीनमध्ये गलवाण खोरे, हॉट स्प्रिंग आणि ग्रोगामधुन मागे फिरण्यावर सहमती झाली आहे.

फिंगर फोरमधुनही चीनने मागे हटावे ही भारताची मागणी आहे. जी स्थिती एप्रिलच्या मध्यामध्ये होती, तशी जैसे थे परिस्थिती पूर्ववत करा, असे भारताचे म्हणणे आहे. आता फिंगर एरिया कळीचा मुद्दा बनला आहे. आधी फिंगर आठ पर्यंत भारतीय सैन्य गस्त घालायचे. पण फिंगर फोर पर्यंत चिनी सैन्याने घुसखोरी केली आहे. चीनने पूर्वीप्रमाणे फिंगर आठ पर्यंत मागे फिरावे, ही भारताची मागणी आहे. चीनच्या या हेकेखोरपणामुळे पुढच्या काही दिवसात स्थिती आणखी बिघडू शकते.