डीसीजीआयची सीरम इन्स्टिट्यूटच्या न्युमोनियावरच्या लसीला मान्यता


पुणे – भारतीय औषध नियामक महामंडळाने (डीसीजीआय) सर्वात पहिल्या संपूर्णतः स्वदेशी न्यूमोकोकल पॉलिसेकेराइड कॉन्जुगेट लसला मान्यता दिली आहे. पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया प्रा. लिमिटेडने ही लस विकसित केली आहे. भारतात न्यूमोकोकल पॉलिसेकेराइड कॉन्जुगेट लसीचा पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसऱ्या टप्प्याची क्‍लिनिकल चाचणी करण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूटने डीसीजीआयची मंजुरी प्राप्त केल्यानंतर संपूर्ण देशभरात या चाचण्या करण्यात आल्या. त्यानंतर भारताव्यतिरिक्त या कंपनीने गॅम्बियामध्येही क्‍लिनिकल चाचण्या केल्या आहेत.

त्यानंतर, या लसीचे उत्पादन करण्याची मान्यता आणि परवानगी मिळण्यासाठी या कंपनीने अर्ज केला. लसीसाठी स्थापन केलेल्या विशेष तज्ञ समितीच्या (एसईसी) सहाय्याने, कंपनीने केलेला अर्ज आणि प्रयोगात्मक क्‍लिनिकल चाचण्यांचा डेटा यांचे ‘डीसीजीआय’ने परीक्षण केले. त्यानुसार समितीने या लसीच्या बाजारातील वितरणाला परवानगी द्यावी, अशी शिफारस केली आहे. न्यूमोनियाच्या क्षेत्रामध्ये ही सर्वात पहिली संपूर्णतः स्वदेशी विकसित लस आहे. भारताबाहेर लसींच्या सर्व उत्पादक कंपन्या स्थित असल्याने या लसीची मागणी याआधी देशातील परवानाधारक आयातकांनी मोठ्या प्रमाणात पूर्ण केली आहे. अर्भकांमध्ये स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया मुळे होणारे आक्रमक रोग आणि न्यूमोनिया विरूद्ध सक्रिय लसीकरणासाठी ही लस वापरली जाते.