भाजप प्रवेशाच्या चर्चेवर सचिन पायलट यांचे स्पष्टीकरण


नवी दिल्ली – उपमुख्यमंत्री तसेच प्रदेशाध्यक्ष पदावरुन सचिन पायलट यांना काँग्रेसने हटवल्यानंतर ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील अशा चर्चा आता जोर धरु लागल्या आहेत. भाजपची दारे सचिन पायलट यांच्यासाठी खुली असल्याचेही भाजपचे अनेक नेते म्हणत आहेत. दरम्यान आपल्या पुढील वाटचालीसंबंधी बोलताना भाजपमध्ये प्रवेश करणार की नाही हेदेखील सचिन पायलट यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले आहे.

आपण अद्यापही काँग्रेसमध्ये असून समर्थकांशी चर्चा करुनच पुढे काय करायचे याचा निर्णय घेतला जाईल, असे सचिन पायलट यांनी सांगितले आहे. भाजपमध्ये प्रवेश करणार का ? असे विचारण्यात आले असता आपण असा कोणताही निर्णय घेतला नसल्याचे सचिन पायलट यांनी स्पष्ट केले. लोकांसाठी आपण काम करत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या ज्योतिरादित्य शिंदे तसेच इतर काही नेत्यांची सचिन पायलट यांनी भेट घेतल्याची चर्चा होती. यावर बोलताना सचिन पायलट यांनी, कोणत्याही भाजपा नेत्याची भेट घेतली नसून ज्योतिरादित्य शिंदे यांना आपण गेल्या सहा महिन्यांपासून भेटलो नसल्याचे सांगितले आहे. कोणत्याही भाजप नेत्याच्या आपण संपर्कात नसल्याचेही सचिन पायलट यांनी म्हटले आहे.

Leave a Comment