बंडखोर सचिन पायलटांची माजी खासदार प्रिया दत्त, संजय निरुपम यांच्याकडून पाठराखण


मुंबई – काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विश्वासू आणि मुंबईतील माजी खासदार प्रिया दत्त यांनी राजस्थानचे काँग्रेसचे बंडखोर उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांची चक्क पाठराखण केली असून यासंदर्भात त्यांनी एक ट्विट केले, त्यात त्यांनी महत्वाकांक्षी असणे चुकीचे नसल्याचे म्हणत काँग्रेस पक्षश्रेष्ठींना घरचा आहेर दिला.

काँग्रेसविरोधात राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी बंडाचा झेंडा रोवला आहे. तेथील अशोक गहलोत सरकार त्यांच्या बंडाळीमुळे अस्थिर बनले आहे. परिणामी, पायलट यांची काँग्रेस पक्षश्रेष्ठींचा आदेश धुडकावल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्रीपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे.

त्या पार्श्वभूमीवर प्रिया दत्त यांनी आज एक ट्विट केले असून आज आम्ही आणखी एक मित्र गमावला आहे. ज्योतिरादित्य शिंदे आणि सचिन पायलट माझे चांगले मित्र होते. या दोघा नेत्यांनी पक्षाला कठीण काळात साथ दिली. राजकारणात महत्वाकांक्षी असणे चुकीचे आहे, यावर आपला अजिबात विश्वास नसल्याचे म्हणत प्रिया यांनी पायलट यांची बाजू उचलून धरली.

दरम्यान राजस्थान काँग्रेसमधील बंडाळीबाबत मुंबई काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम यांनी सोमवारी पक्षनेतृत्वाला दोष दिला होता. पक्षाने योग्य रित्या गहलोत आणि पायलट यांच्यातील संघर्ष हाताळला नाही, अशा शब्दात निरुपम यांनी पक्षश्रेष्ठींवर जाहीर टिका केली होती. तर मुंबईतील काँग्रेसचे माजी खासदार मिलींद देवरा यांनी पायलट यांच्याशी चर्चा करण्यास नकार दिल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Comment