पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या 5G तंत्रज्ञानाची लवकरच चाचणी घेणार : मुकेश अंबानी


मुंबई – आज रिलायन्स इंडस्ट्रीजच्या भागधारकांची वार्षिक बैठक म्हणजेच, एजीएम सुरु असून या बैठकीत मुकेश अंबानी यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. इतिहासात पहिल्यांदाच रिलायन्स एजीएम ऑनलाईन पार पडत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदा एजीएम ऑनलाइन करण्याचा निर्णय घेण्याता आला आहे. दरम्यान मुकेश अंबानी यांनी या बैठकीत बोलताना पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या 5G तंत्रज्ञानाची लवकरच चाचणी सुरु करणार असल्याचे सांगितलं.

याबैठकीत मुकेश अंबानी म्हणाले की, कोरोना व्हायरस एक मोठे आव्हान बनून आपल्यासमोर आले आहे. यातून भारत आणि जग लवकरच बाहेर पडेल, असा मला विश्वास आहे. मुकेश अंबानी पुढे बोलताना म्हणाले की, जियो मीट आतापर्यंत 50 लाख लोकांनी डाऊनलोड केले आहे.

मुकेश अंबानी यांनी रिलायन्स एजीएममध्ये बोलताना सांगितले की, अनेक मोठ्या संधी संकटाच्या वेळी येतात. रिलायन्सचे मार्केट कॅप 150 बिलियन डॉलर्सच्या पुढे गेले आहे. याचसोबत मुकेश अंबानी यांनी गूगलसोबत करार करण्याची घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की, गूगल जिओमध्ये 7.7 टक्क्यांची भागीदारी करणार आहे. म्हणजेच 33 हजार 737 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.


त्याचबरोबर मुकेश अंबानी यांनी सांगितले की, जिओ लवकरच भारतात वर्ल्ड क्लास 5G सेवा सुरु करणार आहे. त्याचबरोबर आम्ही ग्लोबली टेलिकॉम ऑपरेटर्सना 5G सॉल्यूशन देणार असल्याची माहिती मुकेश अंबानी यांनी यावेळी दिली.

Leave a Comment