मेड इन इंडिया कोरोना प्रतिबंधक लसीच्या मानवी चाचणीला सुरुवात


नवी दिल्ली : जीवघेण्या कोरोना व्हायरसपुढे संपूर्ण जग हतबल झाले असून या संकटातून लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी जगभरातील अनेक देश यावरील प्रतिबंधक लस शोधण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. या शर्यतीत दोन भारतीय कंपन्याही सामिल झाल्या आहेत. यातच आता भारतीय औषधी कंपनी Zydus Cadilla ने आज सांगितले की संभाव्य कोरोना लसीसाठी मानवी चाचणीला त्यांनी सुरूवात केली आहे. कंपनीने सांगितले आहे की, प्लाझ्मिड डीएनए लस, प्री-क्लिनिकल टॉक्सिसिटी अभ्यासामध्ये ZYCoV-D ही लस सुरक्षित मानली गेली आहे. यापूर्वी, या कोरोना लसीच्या क्लिनिकल चाचण्यांमध्ये प्रतिकारशक्ती चाचण्यांचे चांगले परिणाम दिसून आले आहेत.

तत्पूर्वी अमेरिकेच्या मॉडर्ना या कंपनीच्या लसीने पहिली चाचणी यशस्वीरित्या पार केली. न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासानुसार असे म्हटले आहे की या लसीची पहिली चाचणी 45 निरोगी लोकांवर घेण्यात आली असून त्यांच्यात याचे खूप चांगले परिणाम दिसून आले. मोडर्नाच्या लसविषयी आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे याचे कोणत्याही रुग्णांवर साइड इफेक्ट दिसून आले नाही आहेत.

अहमदाबादमधील Zydus Cadilla या कंपनीने लसी तंत्रज्ञान केंद्रातील पूर्वसूचना यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर या महिन्याच्या सुरूवातीला जाहीर केले की त्यांची ZyCoV-D लशीची मानवावर चाचणी केली जाणार आहे. मनुष्यावरील या लसीच्या चाचणीसाठी DCGIने देखील मान्यता दिली आहे.

दरम्यान, भारतातील बऱ्याच कंपन्या कोरोना प्रतिबंधक औषधेही बनवत आहेत. मंगळवारी बायोफॉर इंडिया फार्मास्युटिकल्सने (Biophore India) कोरोना औषध फविपिरावीर (Favipiravir) तयार करण्यासाठी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून परवाना मिळविला आहे. हे औषध कोव्हिड -19 सौम्य ते मध्यम प्रकरणांमध्ये वापरले जाते. याव्यतिरिक्त, डीसीजीआयने भारतातील सक्रिय औषधी घटकांच्या निर्मिती आणि निर्यातीलाही मान्यता दिली आहे.

Leave a Comment