ट्रम्प यांचा चीनला धक्का, हाँगकाँगच्या स्वायत्तता कायद्याला मंजूरी

हाँगकाँगमध्ये सुरू असलेल्या दडपशाहीसाठी चीनला जबाबदार धरत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका कायदा व कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली  आहे. या आदेशाद्वारे अमेरिकेने हाँगकाँगला व्यापारासाठी प्राधान्य देणारी व्यवस्था बंद केली आहे. तसेच, कायद्याद्वारे अमेरिकेने हाँगकाँगमध्ये दडपशाही करणाऱ्यांविरोधात प्रतिबंध घालणे सुनिश्चित केले आहे. आता हाँगकाँगसोबत अमेरिका मेन लँड चायनाप्रमाणेच व्यवहार करणार आहे. हाँगकाँगमध्ये चीनने राष्ट्रीय सुरक्षा कायदा आणल्यानंतर अमेरिकेने हे पाऊल उचलले आहे.

ट्रम्प म्हणाले की, “हाँगकाँगला आता मेन लँड चीनप्रमाणेच समजले जाईल. कोणतेही विशेष फायदे दिले जाणार नाहीत, विशेष आर्थिक सुविधा नाहीत आणि कोणत्याही संवेदनशील तंत्रज्ञानाची निर्यात होणार नाही. हाँगकाँगचे स्वातंत्र्य हिसकावून घेण्यात आले असून, अधिकार देखील काढून घेण्यात आलेले आहेत. मला वाटते की या निर्णयानंतर हाँगकाँग मुक्त बाजार स्पर्धा करू शकणार नाही व अनेक लोक हाँगकाँग सोडतील.

ट्रम्प यांनी माहिती दिली की, हाँगकाँगच्या स्वायत्तता कायद्यावर देखील स्वाक्षरी केली आहे. या महिन्याच्या सुरूवातीला संसदेमध्ये या कायद्याला मंजूरी मिळाली आहे. हा कायदा अमेरिकेत हाँगकाँगच्या स्वायत्ततेचे उल्लंघन करणाऱ्या चीन अधिकारी आणि हाँगकाँग पोलिसांवर प्रतिबंध घालण्याचे अधिकार देतो. याशिवाय त्यांच्यासोबत व्यवहार करणाऱ्या बँकावर देखील प्रतिबंध घालण्याचे अधिकार देतो.

Leave a Comment