मध्य प्रदेश आणि राजस्थाननंतर राजकीय उलटफेरांसाठी महाराष्ट्राचाच नंबर -आठवलेंचा गौप्यस्फोट


मुंबई – काही दिवसांपूर्वी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना एनडीएमध्ये सामिल होण्याचे निमंत्रण दिले होते. त्यानंतर त्यांनी आता आणखी एक गौप्यस्फोट केला आहे. आठवले राजस्थानातील राजकीय घडामोडी पाहता म्हणाले, की मध्य प्रदेश आणि राजस्थाननंतर आता राजकीय उलटफेरांसाठी महाराष्ट्राचाच नंबर आहे. त्याचबरोबर आपण सचिन पायलट यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करतो, असे रामदास आठवले म्हणाले आहेत. मंगळवारी एक व्हिडिओ मेसेज आठवले यांनी जारी केला. त्यामध्ये लवकरच महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन होणार असून या ठिकाणी भाजप सरकार स्थापित करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

भाजपशी सचिन पायलट आणि तयांच्या समर्थकांनी हातमिळवणी केल्यास राजस्थानातील काँग्रेसची सत्ता टिकणार नाही. आता पायलट यांना काँग्रेसमध्ये मान राहिलेला नाही. त्यामुळे, पायलट यांनी घेतलेल्या निर्णयाचे मी स्वागत करतो. पायलट आणि त्यांचे 30 आमदार भाजपसोबत आल्यास राजस्थानात कमळ फुलेल, असेही आठवले म्हणाले आहेत.

तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना एनडीएत सामिल होण्याचा सल्ला रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिला होता. पवारांनी महाराष्ट्रात शिवसेना आणि काँग्रेसची साथ सोडून मोदींसोबत यावे. एनडीएमध्ये पवार आले तर महाराष्ट्रासह देशाचा देखील विकास होईल. तसेच भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपाइं अशा महायुतीची सत्ता महाराष्ट्रात येईल, असे आठवलेंनी सांगितले होते.

Leave a Comment