शिक्कामोर्तब… गुगल करणार जिओमध्ये 33 हजार 737 कोटींची गुंतवणूक - Majha Paper

शिक्कामोर्तब… गुगल करणार जिओमध्ये 33 हजार 737 कोटींची गुंतवणूक

मुंबई – आज मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या भागधारकांची वार्षिक बैठक म्हणजेच, एजीएम सुरु असून या बैठकीत मुकेश अंबानी यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. इतिहासात पहिल्यांदाच रिलायन्स एजीएम ऑनलाईन पार पडत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदा एजीएम ऑनलाइन करण्याचा निर्णय घेण्याता आला आहे. या बैठकीत मुकेश अंबानी यांनी जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये आघाडीची टेक कंपनी गुगल मोठी गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली.

गुगल जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये 33 हजार 737 कोटी रुपये गुंतवणार असल्याची माहिती यावेळी अंबानी यांनी दिली आहे. या गुंतवणूकीद्वारे गुगल कंपनी जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये 7.7 टक्क्यांची हिस्सेदारी घेईल. या गुंतवणूकीमुळे जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये लॉकडाउनदरम्यान गेल्या तीन महिन्यांत झालेल्या एकूण गुंतवणूकीचा आकडा 1 लाख 52 हजार 056 कोटी रुपये होईल.

गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनीही या गुंतवणूकीबाबत ट्विटरद्वारे माहिती दिली. इंटरनेट प्रत्येकापर्यंत पोहोचावे आणि प्रत्येकाने त्याचा वापर करायला हवा, त्यामुळे जिओसोबत भागीदारी केल्याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया पिचाई यांनी दिली आहे.

Leave a Comment