भाजपा खासदाराचा बॉलिवूडकरांना सवाल; मोदींच्या भेटीवेळी सुशांत कुठे होता?


अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येला काल एक महिना पूर्ण झाला असून त्याच्या पश्चात बॉलिवूडकरांमधील वागणुकीमध्ये तीळमात्र फरक पडला नसल्याचे सध्यातरी दिसत आहे. बॉलिवूमधील बड्या हस्तींच्या हस्तक्षेपाचा सुशांत हा बळी ठरल्याचे अनेक लोकांना वाटते. अनेक दिग्दर्शक, अभिनेत्यांनी यावर या बड्या हस्तींविरोधात आवाज उठविला आहे. यावरून या हस्तींनाही चौकशीसाठी पोलिसांनी बोलावले आहे. सुशांतच्या आत्महत्येचा तपास अद्याप तपास पूर्ण झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याचदरम्यान अभिनेत्री आणि भाजपाच्या खासदार रुपा गांगुली यांनी काही खळबळजनक प्रश्न उपस्थित केले आहेत.

बॉलीवूडमधील गटबाजी आणि त्याच्याकडे असलेले चित्रपट काढून दुसऱ्याला दिल्यामुळे सुशांतसिंग राजपूत हा त्रस्त होता आणि त्यामुळेच आपले जीवन संपवल्याचा आरोप अनेकांनी केला आहे. यामध्ये कंगना रानावतनंतर आता रुपा गांगुली यांनी देखील टीका केली आहे. तसेच या प्रकरणाची सीबीआय चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी केली आहे.

काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी आलेल्या बॉलिवूड कलाकारांच्या चमूचा फोटो रुपा गांगुली यांनी पोस्ट करून थेट याचा प्रमुख असलेल्या करण जोहरला प्रश्न विचारले आहेत. हे कलाकार करण जोहरच्या चार्टर्ड विमानाने मुंबईहून दिल्लीला आले होते, त्यांच्या चमूमध्ये सुशांत होता का? असा प्रश्न विचारला आहे.

त्याचबरोबर दुसऱ्या ट्विटमध्ये गांगुली यांनी म्हटले आहे की, माननीय़ पंतप्रधान डिसेंबर 2018 ते जानेवारी 2019 मध्ये बॉलिवूडच्या कलाकारांना कितीवेळा भेटले? त्यामध्ये सुशांत होता का? असा प्रश्न विचारला आहे.

आपल्या पुढील ट्विटमध्ये गांगुली यांनी पुन्हा प्रश्न करत कोणी या बॉलिवूड कलाकारांच्या भेटीचे नियोजन केले होते? की संपर्क साधला होता? पंतप्रधानांना भेटण्याची एक पद्धत असते. प्रोटोकॉल असतो. त्यानुसार मला विश्वास आहे की सुशांतसारख्या प्रतिभावन कलाकाराला नक्कीच टाळण्यात आले नसते. मग ही यादी कोणी बनविली होती? असा सवाल करून त्यांनी पंतप्रधान कार्यालयालाही या वादात ओढले आहे.

जर या भेटीला सुशांत देखील असेल तर मोदींसोबत त्याचा एकही फोटो का नाही? असा प्रश्न विचारला आहे. मोदींच्या शपथविधी कार्यक्रमातील फोटो गांगुली यांनी शेअर केला आहे. त्यामध्ये सुशांत कपिल शर्मा आणि करण जोहरच्यामध्ये बसलेला आहे. अशा लोकांना भेटण्यासाठी मोदी उत्सुक असतात. पंतप्रधान कार्यालयाने या समारंभाची यादी बनविली होती. त्या यादीमध्ये सुशांतच्या नावाचा समावेश होता. मग त्या भेटीवेळी का नव्हता, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

Leave a Comment