जाणून घ्या Jio Glass चे फिचर्स, किंमत


आज मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या भागधारकांची वार्षिक बैठक म्हणजेच, एजीएम सुरु पार पडली. या बैठकीत मुकेश अंबानी यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. इतिहासात पहिल्यांदाच रिलायन्स एजीएम ऑनलाईन पार पडली. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदा एजीएम ऑनलाइन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुकेश अंबानी यांनी या सभेमध्ये जिओ ग्लास सेवेची घोषणा केली आहे. त्याच जिओ ग्लासचे फिचर्स, तसेच किंमतीबाबतची माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत.

थ्रीडी इंटरॅक्शन जिओ ग्लास ही सेवा असणार आहे. संवाद साधणाऱ्या व्यक्तीची हॉलोग्राम प्रतिकृती यामध्ये पाहता येणार आहे. त्याचबरोबर जिओ ग्लास प्रामुख्याने डिजीटल शिक्षणाचे ध्येय समोर ठेऊन लाँच करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांना जिओ ग्लासमुळे व्ह्यर्चूअल थ्रीडी क्लास रुमच्या माध्यमातून संवाद साधता येईल, असे मत या सेवेची घोषणा करताना रिलायन्सच्या किरण थॉमस यांनी मांडले आहे.

रिअ‍ॅलिटी क्लाउडचे तंत्रज्ञान वापरुन जिओने रियल टाइम टेलिकास्ट करण्याची सुविधा उपलब्ध करुन देणार असल्याचेही थॉमस म्हणाले. त्याचबरोबर यापुढे पुस्तकाच्या माध्यमातून भूगोल शिकणे इतिहास जमा होणार असून हॉलोग्रामच्या माध्यमातून त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल, अशी माहिती थॉमस यांनी दिली आहे.


जिओ ग्लासची सेवा बाजारात थ्रीडी तंत्रज्ञान सर्वसामान्यांना वापरता येण्याच्या दृष्टीने आणण्यात आली आहे. सध्याच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या सुविधेमध्ये हॉलोग्राम संवादाची म्हणजेच समोर संवाद साधणाऱ्या व्यक्तीची डिजीटल प्रतिमा पाहता येणार असून संवाद अधिक खराखुरा वाटण्यास मदत होणार आहे.


७५ ग्राम एवढे जिओ ग्लास अ‍ॅव्हिएटर्सचे वजन असणार आहे. पर्सनलाइज ऑडिओची सुविधा यामध्ये देण्यात आली असून 5 जीला जिओ ग्लासचे तंत्रज्ञान सपोर्ट करणार आहे. वायरच्या माध्यमातून जिओ ग्लास हे मोबाइलशी कनेक्ट करुन डेटा ट्रान्सफर देखील करता येणार आहे. सध्या २५ अ‍ॅप्लिकेशनला जिओ ग्लास हे सपोर्ट करते, असेही कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे.


त्याचबरोबर जिओ ग्लास डेटा ट्रान्सफरच्या पर्यायामुळे या ट्रान्सफरच्या सोयीमुळे वेगवेगळ्या कारणांसाठी वापरता येईल असे कंपनीचे म्हणणे आहे. टू डी व्हिडिओ कॉलचाही पर्याय जिओ ग्लासमध्ये उपलब्ध करुन देण्यात आला आहे. जिओ ग्लासेसचे वितरण ऑगस्ट महिन्यापासून सुरु होणार आहे. या ग्लासेसची किंमत अंदाजे २०० डॉलर म्हणजेच १४ हजारांच्या आसपास असणार आहे.

Leave a Comment