नेपाळचे पंतप्रधान बरळले; प्रभू श्रीराम नेपाळी होते, त्यांची खरी अयोध्या नेपाळमध्ये


काठमांडू: सध्या नेपाळमधील पंतप्रधान केपी शर्मा ओली यांचे सरकार धोक्यात असतानाच त्यांना आता प्रभू श्रीरामचंद्रांचे स्मरण झाले आहे. केपी शर्मा ओली यांनी यावेळी अजब दावा केला आहे. खरी अयोध्या भारतात नाही तर नेपाळमध्ये असून भगवान राम भारतीय नाही तर नेपाळी असल्याचा दावा केपी शर्मा ओली यांनी केला आहे.


नेपाळमधील राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टीचे नेते आणि माजी उप पंतप्रधान कमल थापा यांनी ओली यांच्या या वक्तव्याचा निषेध केला आहे. ट्विट करत त्यांनी म्हटले की, कोणत्याही पंतप्रधान पदावर बसलेल्या व्यक्तीचे असे निराधार आणि पुरावे नसलेले वक्तव्य करणे योग्य नाही. भारत आणि नेपाळचे संबंध पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना खराब करायचे आहेत, असे त्यांच्या वक्तव्यावरुन दिसून येत आहे. त्यांनी असे न करता दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे थापा यांनी म्हटले आहे.

नेपाळमधील नागरिकांमध्ये ओली यांच्याबाबत भारतविरोधी कामकाज आणि वक्तव्यांमुळे असंतोष आहे. भारतविरोधी कामकाज करण्यासाठी चीनचा छुपा पाठिंबा असल्याचीही चर्चा होत आहे. त्याचबरोबर राजीनाम्यांची मागणी केली जात आहे. तसेच नेपाळमध्ये कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यातही केपी शर्मा ओली यांचे सरकार अपयशी ठरले आहे.

Leave a Comment