गणपतीसाठी चाकरमान्यांना जाता येईल, पण अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतील – अनिल परब


मुंबई – जीवघेण्या कोरोना व्हायरसचे सावट यंदाच्या गणेशोत्सवावरही असल्यामुळे दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सवासाठी यंदा कोकणात जाता येणार की नाही असा प्रश्न चाकरमान्यांना पडला आहे. आज याचसंदर्भात परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीनंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये चाकरमान्यांना गणपतीसाठी गावी जाण्याची परवानगी असल्याची माहिती परब यांनी दिली आहे.

बैठकीमध्ये कोकणातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आल्याचेही परब यांनी सांगितले. त्याचबरोबर बैठकीत तसेच चाकरमान्यांच्या समस्यांवर चर्चा झाली असून मुख्यमंत्र्यांना त्यासंदर्भातील तपशील देण्यात येणार आहे. त्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे परब यांनी स्पष्ट केले आहे. परब यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरुनही या बैठकीसंदर्भातील माहिती दिली आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे प्रवासी रेल्वे वाहतूक बंद असल्याने यंदा अधिक एसटी बस सोडल्या जाणार असल्याचेही परब यांनी स्पष्ट केले आहे.


मागील काही दिवसांपासून कोकणामध्ये चाकरमान्यांना यंदा गणेशोत्सवासाठी परवानगी देण्यात येणार की नाही यासंदर्भात बराच गोंधळ सुरु असल्यामुळेच परिवहन मंत्र्यांनी आज नव्या प्रशासकीय इमारतीत आढावा बैठक घेतली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये तसेच कोकणातील नागरिकांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेऊन कशाप्रकारे उत्सव साजरा करता येईल यासंदर्भात नवीन प्रशासकीय इमारत येथे बैठक घेण्यात आल्याचे परब यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहे.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना त्रास कमी व्हावा यासाठी करोनासंदर्भातील नियम व अटी निश्चित केल्या जाणार असून त्यावरील अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांचा असेल, असेही परब यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले आहे. दरवर्षी गणेशोत्साच्या काळात चाकरमान्यांना गावी जाता यावे म्हणून मोठ्या प्रमाणात विशेष रेल्वे गाड्या सोडल्या जातात. मात्र यावर्षी करोनामुळे हे शक्य नसेल. त्यामुळेच यंदा परवानगी मिळाल्यास चाकरमान्यांसाठी विशेष एसटी बसेस सोडल्या जातील, असे परब यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.

Leave a Comment