अवघ्या काही मिनिटांतच सचिन पायलट यांनी बदलला ट्विटरवरील बायो!


जयपुर – राजस्थान सरकारमध्ये उलथापालथ करुन मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना बहुमत सिद्ध करण्याचे आव्हान देणाऱ्या सचिन पायलट यांची काँग्रेसकडून उपमुख्यमंत्रिपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांच्या 3 समर्थक आमदारांनाही मंत्रिपदवरुन काढून टाकण्यात आले आहे. तसचे सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रिपदासह प्रदेशाध्यक्ष पदावरूनही डच्चू देण्यात आला आहे.

काँग्रेसने सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रिपद आणि दीर्घकाळ राहिलेल्या राजस्थान काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावरून हटवल्यानंतर आपल्या अधिकृत ट्विटर हॅंडलवर त्यांनी तात्काळ काही बदल केले आहेत. त्यांनी यामध्ये आपल्या वैयक्तिक माहितीमध्ये उपमुख्यमंत्री त्याचबरोबर राजस्थान राज्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष असल्याचेही नमूद करण्यात आलेली ओळख पुसून टाकली आहे.


काँग्रेसने उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यावर मोठी कारवाई केली असून उपमुख्यमंत्री पदावरुन सचिन पायलट यांना हटवण्यात आल्यानंतर सचिन पायलट यांनी एका ओळीचे ट्विटही केले. सत्याला त्रास दिला जाऊ शकतो, पण पराभूत करता येत नाही, असे सचिन पायलट यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. काँग्रेसच्या कारवाईनंतर सचिन पायलट काय भूमिका घेणार किंवा काय बोलणार याकडे सगळ्या देशाचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment