सलाम! स्वतः कमरेभर पाण्यात उतरून, इतरांना पुरापासून वाचवत आहे हा आमदार

पुरामुळे आसामची परिस्थिती सध्या बिकट झाली आहे. यातच एका आमदाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोकांच्या मध्ये जाऊन मदत करणारा खरा नेता असतो, असे म्हटले जाते. या आमदाराने देखील याचेच उदाहरण सर्वांसमोर ठेवले आहे. आसाम सरकारमधील आमदार मृणाल सैकिया हे सुदूर गावात गेले व स्वतः कमरेभर पुराच्या पाण्यात उतरले व इतरांना वाचवले.

लोकांची मदत करतानाचा एक व्हिडीओ देखील त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांनी व्हिडीओ शेअर करत लिहिले की, पुराने माझे विधानसभा क्षेत्र उद्धवस्त केले आहे. आम्ही आतील भागात अडकलेल्या लोकांना काढण्याचा प्रयत्न करत आहोत.  या भागामध्ये माणसांसह प्राण्यांना देखील वाचवण्याचे कार्य सुरू आहे.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, कशाप्रकारे आमदार सैकिया हे लोकांना काही लाकडांच्या ओंडक्यांवर बसवून नावेपर्यंत पोहचवत आहे. त्यांच्यासोबत बचाव कार्याची टीम देखील दिसत आहे. दरम्यान, पुरामुळे राज्यातील 24 जिल्ह्यांच्या 2,015 गावातील 13 लाख लोकांवर परिणाम झाला आहे. सैकिया यांचा हा व्हिडीओ गुव्हाटीपासून 264 किमी लांब, विधानसभा क्षेत्र खुमताईचा आहे.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी त्यांच्या कार्याचे भरभरून कौतुक करत आहेत.

Leave a Comment