कोरोना चाचणी करण्यास अभिनेत्री रेखा यांचा नकार


बॉलीवूडच्या उमराव जान अर्थात ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांच्या बंगल्यावरील सुरक्षारक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर त्यांच्या बंगल्याच्या परिसरातील अन्य चार बंगल्यांचे सुरक्षारक्षकांना देखील कोरोनाची बाधा झाली आहे. मुंबई महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये या सर्वांना हलविण्यात आले आहे. रोज हे सुरक्षारक्षक एकमेकांना भेटत असल्यामुळे त्यांना कोरोनाची लागण झाली. पण याच दरम्यान कोरोना चाचणी करण्यास रेखा यांनी नकार देत घरातच स्वतःला क्वारंटाईन केले आहे.

बंगल्यातील सुरक्षारक्षकाला कोरोनाची लागण झाल्यानंतर रेखा यांच्यासह त्यांची मॅनेजर फरजाना आणि घरातील चार अन्य कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट करायची होती. पण मुंबई महापालिकेचे कर्मचारी जेव्हा रेखा यांच्या घरी पोहोचले तेव्हा दरवाजाच उघडण्यात आला नाही. यासंदर्भात एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार रेखा यांच्या दरवाजाची बेल महापालिकेच्या टीमने वाजवली तेव्हा रेखा यांच्या मॅनेजरने येण्याचे कारण विचारले. कोरोना चाचणीसाठी आलो असल्याचे पालिकेच्या पथकाने फरजाना यांना सांगितले. तेव्हा फरजाना यांनी आपला नंबर द्या आणि नंतर बोलू असे सांगितल्यामुळे महापालिकेच्या पश्चिम वॉर्डचे मुख्य वैद्यकीय अधिकारी संजय फगे यांनी फरजाना यांना फोन केला. त्यांनी सांगितले की रेखा या पूर्णपणे बऱ्या आहेत आणि आपले काम चांगल्यारितीने करत आहेत. रेखा या कोणाच्याही संपर्कात आलेल्या नसल्यामुळे त्या कोरोनाची चाचणी करू इच्छित नसल्याचे फरजाना यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगितले.

यानंतर रेखा यांचे घर सॅनिटाईज करण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी एक नवीन पथक पाठविले होते. त्यांनी घरात जाण्याचा प्रयत्न केला असता यावेळीही दरवाजा उघडण्यात न आल्यामुळे पथकाने बंगल्या बाहेरच्या भागाला सॅनिटाईज केले. सुरक्षा रक्षकांचे केबिनही सॅनिटाईज केले व माघारी फिरले.

Loading RSS Feed

Leave a Comment