गुजरातमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना


भावनगर – संपूर्ण देश कोरोनाविरोधात लढाई लढत असतानाच गुजरातमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची गुजरातच्या भावनगर जिल्ह्यातील सिहोर गावात विटंबना करण्यात आली आहे. सिहोर पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. सोमवारी मध्यरात्री ही घटना घडल्यामुळे संपूर्ण परिसरात असंतोष निर्माण झाला आहे. तसेच याप्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणीही आता जोर धरु लागली आहे. सध्या सोशल मीडियावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करत असतानाचे फोटो व्हायरल होऊ लागले आहेत.

काही समाजकंटकांनी सोमवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याचा चेहरा बादलीने झाकला, त्याचबरोबर पुतळ्याच्या शेजारी दारूच्या रिकाम्या बाटल्या ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. हे धक्कादायक कृत्य पाहिल्यानंतर आज सकाळी आसपासच्या लोकांनी सिहोर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. सोमवारी मध्यरात्री ते सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली आहे. अज्ञात व्यक्तींविरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणी कलम 295 अंतर्गत सिहोर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे.

Leave a Comment