देशात सलग दुसऱ्या दिवशी २८ हजाराहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद


नवी दिल्ली – देशात काल दिवसभरात आतापर्यंतची सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. काल दिवसभरात देशात २८ हजार ७०१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून ५०० जणांनी आपला जीव गमावला आहे. त्याचबरोबर देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ८ लाख ७८ हजार २५४ वर पोहोचली असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

देशात सलग दुसऱ्या दिवशी २८ हजार रुग्ण सापडले आहेत. २८ हजार ६३७ रुग्णांची रविवारी नोंद झाली होती. दरम्यान सध्याच्या घडीला देशात ३ लाख १ हजार ६०९ कोरोनाबाधित रुग्ण असून ५ लाख ५३ हजार ४७१ जणांना उपचार करुन घरी सोडण्यात आले आहे. देशात आतापर्यंत कोरोनामुळे २३ हजार १७४ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

दूसरीकडे महाराष्ट्रात ७,८२७ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या २ लाख ५४ हजार झाली आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या अवघ्या सहा दिवसांमध्ये ५० हजाराने वाढली. गेल्या २४ तासांत राज्यात १७३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, एकूण मृतांची संख्या ही १०,२८९ झाली.

दरम्यान, काल दिवसभरात एक हजार २६३ मुंबईकरांना कोरोनाची बाधा झाली असून, एकूण रुग्णसंख्या ९२ हजार ७२० एवढी झाली आहे. गेल्या ४८ तासांमध्ये ४४ जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ५० दिवसांवर पोहोचला आहे.

Leave a Comment