धारावी कोरोनामुक्त करण्यासाठी संघाने काम केले असून सरकारने याचे श्रेय घेऊ नये - Majha Paper

धारावी कोरोनामुक्त करण्यासाठी संघाने काम केले असून सरकारने याचे श्रेय घेऊ नये


कोल्हापूर : देशभरात कोरोनाचे तांडव सुरु असतानाच आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या धारावीने या जीवघेण्या कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. कोरोनावर धारावीने मात केल्यानंतर आता यावरुन श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. त्यातच भाजपचे नेते नितेश राणे यांच्या पाठोपाठ आता धारावी कोरोनामुक्त करण्यात संघाने काम केले असून श्रेय सरकारने घेऊ नये, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलत असताना महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. मुंबईतील धारावी कोरोनामुक्त झाली आहे, याचा आम्हाला आनंद आहे. ज्या चांगल्या गोष्टी केल्या आहे, त्याचे कौतुक झाले पाहिजे. पण, आरएसएसच्या स्वयंसेवकांनी धारावीत जीव धोक्यात घालून प्रत्येक घराघरात जाऊन स्क्रिनिंग केले. कुणाला ताप आहे, कुणाला श्वसनाचा त्रास आहे, याची तपासणी केली. मुंबई महानगरपालिकेनेही काम केले, असे नाही. पण सरकारने सगळे श्रेय घेण्याचे काही कारण नसल्याचे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले.

सरकारने कोरोना विरुद्ध लढाई करताना भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोपही पाटील यांनी केला. ज्या गोष्टी कौतुकास्पद आहे. त्याचे आम्ही कौतुक करतोच. पण हसन मुश्रीफ यांनी विकासाची एवढी कामे सहा महिन्यात झाली असून देवेंद्र फडणवीस यांचे डोळे विस्फारून जातील, असे म्हटले आहे. पण, कोरोनाबाधितांचा मृतदेहासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिक कव्हरमध्ये महाविकास आघाडीने घोटाळा केला आहे. शिवभोजन थाळी 5 रुपयांना देण्यात आली पण कोविड सेंटरमध्ये कोरोनाबाधितांना थाळी तीनशे रुपयांनी देण्यात आली. कोरोना संपल्यावर हा मुद्दा आपण विधान परिषदेत उपस्थित करणार असल्याचेही पाटील म्हणाले.

तसेच, ग्रामपंचायतींना निधी जावा असा 14 वा वित्त आयोग पंतप्रधान मोदी यांनी स्थापन केला होता. आता काही ग्रामपंचायतींचे पैसे उरले आहे. ते एफडीमध्ये ठेवण्यात आले आहे. गावासाठी ते पैसे वापरावे असा सरकारचा जीआर आहे. पण, राज्य सरकारने एक पत्रक प्रसिद्ध करून गावातील एफडीची रक्कम सरकारकडे परत केली आहे. पण, असे करता येत नाही. केंद्राने गावासाठी दिलेले पैसे हे गावासाठीच वापरावे लागतील, याबद्दल केंद्रीय ग्रामविकास मंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

Leave a Comment