देशातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात मागील २४ तासांत २८,६३७ नव्या रुग्णांची वाढ


नवी दिल्ली – देशातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात दररोज होणारी वाढ देशातील नागरिकांची चिंता वाढवत आहे. कारण मागील आठ दिवसांपासून देशात प्रत्येक तासांला एक हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. देशात आठ दिवसांत दोन लाख नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. उपचार घेणाऱ्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त असले तरी कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या चिंतेत भर घालणारी आहे. यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार मागील २४ तासांत २८ हजार सहाशे ३७ नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर कोरोनामुळे ५५१ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

देशातील कोरोनाबाधितांचा आकडा आठ लाख ४९ हजार ५५३ एवढा झाला आहे. तर आतापर्यंत पाच लाख ३४ हजार ६२१ रुग्णांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सध्या दोन लाख ९२ हजार २५८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. देशात आतापर्यंत २२ हजार ६७४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात उपचार सुरू असलेल्या रुग्णसंख्येच्या तुलनेत, कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. देशपातळीवर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६२.७८ टक्क्यांवर पोहचले आहे. महाराष्ट्र, तमिळनाडू, गुजरात आणि दिल्लीत मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडत आहेत.

Leave a Comment