शरद पवारांची मुलाखत ही तर ‘मॅच फिक्सिंग’ – फडणवीस


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेली मुलाखत ही तर ‘मॅच फिक्सिंग’ असल्याची घणाघाती टीका विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्याचबरोबर ही संपूर्ण मुलाखत संपल्यावरच यावर मी प्रतिक्रिया देईन, असेही फडणवीस म्हणाले आहेत. कोणीही सरकार पाडत नाही आहे, असे सांगणे म्हणजे कांगावा असल्यामुळे कोरोनाच्या लढाईत आलेले अपयश दूर करण्याचा प्रयत्न असल्याचा सणसणीत टोला फडणवीस यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.

ज्या दिशेने राज्यात कोरोनाबाबत आपण जात आहोत, ती परिस्थिती चिंताजनक आहे. देशातील 46 टक्के मृतांचा आकडा आपल्या राज्यात आहेत. त्याचबरोबर अनेक मृत्युंची नोंद देखील झाली नसून 600 जणांचा मृत्यूची नोंद अद्यापही अपलोड केलेली नाही. लपवालपवी होऊनही येणारे आकडे मोठे आहेत. संख्या लपवण्यासाठी कमी चाचण्या केल्या जात असल्याचा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना ‘नया है वह’ असे म्हणत टोला लगावला आहे. मुख्यमंत्र्यांना जे योग्य वाटतात, ते त्यांना मंत्री करु शकतात. पण मंत्री बनवल्याने शहाणपण येतच असे नाही, अशा शब्दांत फडणवीस यांनी टीका केली. अमिताभ आणि अभिषेक यांना लवकर आरोग्यलाभ व्हावा. त्यासोबतच ज्यांना कोरोना झाला आहे. त्यांची प्रकृतीत सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना देखील फडणवीस यांनी यावेळी केली आहे.

Leave a Comment