अहमद पटेलांच्यासमोर सचिन पायलट यांनी व्यक्त केली नाराजी


नवी दिल्ली – राजस्थानातील काँग्रेस सरकार मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील तीव्र मतभेदांमुळे अडचणीत सापडले असून मध्य प्रदेशची पुनरावृत्ती सचिन पायलट यांच्या नाराजीमुळे राजस्थानातही घडू शकते, अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.

ज्योतिरादित्य सिंधिया यांनी तीन महिन्यांपूर्वी मध्य प्रदेशात काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत त्यांचे समर्थन करणारे आमदारांनी देखील काँग्रेसचा हात सोडल्यामुळे मध्य प्रदेशातील कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे सरकार कोसळले. आता त्याच दिशेने राजस्थानही चालल्याचे दिसत आहे.

सचिन पायलट यांनी राजस्थानातील या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत जाऊन काँग्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पटेल यांची भेट घेतली. यासंदर्भातील वृत्त हिंदुस्थान टाइम्सने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार अहमद पटेल यांना भेटून सचिन पायलट यांनी आपली नाराजी त्यांच्या कानावर घातली. त्याचबरोबर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासोबत असलेले मतभेद विकोपाला गेल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे अहमद पटेल हे राजकीय सल्लागार समजले जातात.

पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे गेहलोत यांच्याबद्दलचा सचिन पायलट यांनी तक्रारीचा पाढाच वाचून दाखवला असे या घडामोडींशी संबंधित असलेल्या एका सूत्रांने सांगितले. सचिन पायलट यांनी काँग्रेसचे दुसरे वरिष्ठ नेते के.सी.वेणूगोपाल यांची सुद्धा भेट घेतली. राजस्थान विधानसभा निवडणुकीत २०१८ साली जेव्हा काँग्रेसने २०० पैकी १०७ जागा जिंकल्या, तेव्हा मुख्यमंत्रीपदावरुन पेच निर्माण झाला होता. मुख्यमंत्रीपदाच्या मागणीवर सचिन पायलट ठाम होते. त्यावेळी तत्कालिन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पायलट यांची समजूत काढून उपमुख्यमंत्रीपदासाठी त्यांना राजी केले होते.

Leave a Comment