अभिनेत्री रेखा यांच्या बंगल्यावरील सुरक्षारक्षकाला कोरोनाची लागण; महापालिकेने सील केला बंगला


बॉलिवूडची उमराव जान अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांचा बंगला बृह्नमुंबई महानगरपालिकेने सील केला आहे. रेखा यांच्या बंगल्यावरील सुरक्षारक्षक कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यानंतर रेखा यांचा बंगला मुंबई महानगरपालिकेने सील केला. बंगल्याच्या बाहेर नोटीस लावून बंगल्याला कोरोना कन्टेन्मेन्ट झोन घोषित केले आहे. रेखा यांचा ‘सी स्प्रिंग’ हा बंगला वांद्रे येथील बँडस्टँड परिसरात आहे. या बंगल्यात दोन सुरक्षारक्षक असतात. त्यापैकी एकाला कोरोनाची लागण झाली आहे. संबंधित सुरक्षारक्षकावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

दरम्यान, संपूर्ण परिसराला मुंबई महानगरपालिकेने सॅनिटाइज केले आहे. याप्रकरणी रेखा किंवा त्यांच्या प्रवक्त्याकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आली नाही. रेखा यांच्या घराबाहेर नेहमी दोन सुरक्षारक्षक असतात. यातील एक सुरक्षारक्षक कोरोनाग्रस्त झाला आहे. सध्या त्याच्यावर बीकेसीतील एका दवाखान्यात उपचार सुरू आहेत.

कोरोनाचा फटका याआधीही बॉलिवूडला बसला आहे. आमिर खानच्या घरातील सात कर्मचारी गेल्या महिन्यातच कोरोना पॉझिटिव्ह निघाले होते. यात आमिरचे दोन अंगरक्षक आणि एक स्वयंपाक करणारा कर्मचारीही कोरोना पॉझिटिव्ह आला होता. यानंतर आमिरच्या संपूर्ण कुटुंबाची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. यात त्याच्या घरातील सदस्य निगेटिव्ह आले होते. त्याआधी जान्हवी कपूर आणि करण जोहरच्या स्टाफलाही कोरोनाची लागण झाली होती.

Leave a Comment