क्वारंटाईन असल्याचे वृत्त राज्यपाल कोश्यारी यांनी फेटाळले


मुंबई – राजभवनतील कोरोनाबाधित कर्मचारी, अधिकाऱ्यांची संख्या आता 24 वर पोहचली असून याआधी राजभवनमधील 18 कर्मचारी कोरोनाबाधित आढळले होते. त्यानंतर 100 कर्मचाऱ्यांची चाचणी घेण्यात आली. त्यातील 40 कर्मचाऱ्यांचे अहवाल शनिवारी सायंकाळी आले. त्यात 14 जण पॉझिटिव्ह आढळले होते. रविवारी दुपारी आणखी एक अहवाल आला असून, त्यात अन्य 8 कर्मचारी बाधिल आढळल्यामुळे राजभवनमधील कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांची संख्या आता 24 झाली आहे. याचदरम्यान काही माध्यमांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वतःला क्वारंटाइन करून घेतल्याचे आपल्या वृत्तात म्हटले होते. त्यावर स्वतः राज्यपालांनी माहिती दिली असून, आपण स्वतःला क्वारंटाइन केले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.


राज्यपालांचे निवासस्थान व कार्यालय असलेल्या राजभवनात जवळपास 24 कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आल्यानंतर मुंबई महानगरपालिकेने या कर्मचाऱ्यांच्या पुन्हा एकदा चाचण्या केल्या आहेत. तसेच राजभवनाचे सॅनिटायझेशनही करण्यात आले आहे. दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर स्वतःला क्वारंटाइन केल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले होते. राज्यपाल कोश्यारी यांनी ट्विट करून ते वृत्त निराधार असल्याचे म्हटले आहे.

माझी प्रकृती ठणठणीत असून आपण स्व-विलगीकरणात नाही. आपण आवश्यक टेस्ट केल्या असून त्यांचे परिणाम देखील नकारात्मक आले आहेत. कोरोनाची लक्षणे देखील आपल्यात दिसून आली नाहीत. आपण कार्यालयीन कर्तव्ये बजावताना मुखपट्टीचा वापर, सुरक्षित सामाजिक अंतर, आदी आवश्यक ती खबरदारी घेत आहो. माझ्या प्रकृतीसंदर्भात काही ठिकाणी येत असलेले वृत्त निराधार आहे. माझी तब्येत चांगली असल्याचे राज्यपालांनी म्हटले आहे.

Leave a Comment