…म्हणून रिक्षातून नेला कोरोनाग्रस्ताचा मृतदेह


हैदराबाद : देशभरात कोरोना या जीवघेण्या व्हायरसने अक्षरशः थैमान घातले असून कोरोनाग्रस्त रुग्णांचे हाल मृत्यूनंतरही थांबत नाहीत. त्यातच रुग्णवाहिका न मिळाल्याने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाचा मृतदेह चक्क रिक्षातून घेऊन जाण्याची वेळ कुटुंबियांवर आली आहे.

कोरोना रूग्णाच्या मृतदेहाकडे दुर्लक्ष केल्याचा आणखी एक धक्कादायक प्रकार तेलंगणाच्या निजामाबाद येथील शासकीय रुग्णालयात घडला आहे. शासकीय रुग्णालयात कोरोना रुग्णाच्या निधनानंतर मृतदेह स्मशानभूमीत नेण्यासाठी रुग्णवाहिका नसल्यामुळे कुटुंबियांना रिक्षामधून मृतदेह नेण्याची वेळ आली आहे. त्याचबरोबर रुग्णालयातील एकही कर्मचारी यावेळी या मृतदेहासोबत स्मशानभूमीपर्यंत आला नाही.


रुग्णवाहिके अभावी निजामाबाद येथील शासकीय रुग्णालयातून कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृतदेह कुटुंबियांकडे सोपवला. रुग्णालयाच्या अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार मृताचा नातेवाईक रुग्णालयातच काम करतो त्यामुळे हा मृतदेह त्याच्या मदतीने स्मशानभूमीत रिक्षात घालून नेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

50 वर्षांच्या व्यक्तीला 27 जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. रुग्णवाहिकेची वाट पाहण्याऐवजी कुटुंबियांनी रिक्षा बोलवून मृतदेह स्मशानभूमीत नेला अशी माहिती डॉ. राव यांनी दिली आहे.

Leave a Comment