तुकाराम मुंढेंकडून काढून घेतला नागपूर स्मार्ट सिटी सीईओ पदाचा चार्ज


नागपूर : आयुक्त विरुद्ध महापौर असा सामना नागपूर महानगरपालिकेत रंगला असतानाच कर्तव्यदक्ष असलेल्या आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या अडचणीत दिवसागणिक वाढत होत आहे. त्याचबरोबर स्मार्ट सिटीत घोटाळा केल्याचा गंभीर आरोप तुकाराम मुंढे यांच्यावर करण्यात आल्यामुळे तुकाराम मुंढे यांच्या विरोधात महापौर संदीप जोशी यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. तर दुसरीकडे, तुकाराम मुंढेंकडून नागपूर स्मार्ट सिटी सीईओ पदाचा चार्ज काढून घेण्यात आला आहे.

महेश मोरोने यांची नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या प्रभारी सीईओपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पण, आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखालीच महेश मोरोने यांना काम करावे लागणार आहे. नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी पूर्ण वेळ सीईओ नेमण्यासाठी पुढील काही दिवसांत जाहिरात काढणार असल्याची माहिती महापौर संदीप जोशी यांनी दिली आहे.

आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरूद्ध महापौर संदीप जोशी यांनी प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. स्मार्ट सिटीतील घोटाळ्याबाबत तुकाराम मुंढेंवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी जोशी यांनी या अर्जात केली आहे. स्मार्ट सिटीत कोट्यावधी रुपयांचा घोटाळा तुकाराम मुंढे यांनी केला आहे. त्यांच्यासह आणखी तीन अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे, असा आरोप जोशी यांनी केला असून त्यासाठी त्यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

Leave a Comment