येत्या सोमवारपासून पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा लॉकडाऊन


पुणे : उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये तसंच पूर्ण पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यानुसार येत्या सोमवारपासून म्हणजे 13 जुलैपासून पुढचे 15 दिवस हा लॉकडाऊन असणार आहे. त्याचबरोबर लवकरच याची सविस्तर नियमावली जारी केली जाणार आहे.

संपूर्ण पुणे जिल्ह्यात यामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड मनपा परिसरातही अजित पवारांच्या आदेशानुसार पुन्हा लॉकडाऊन करण्यात येईल. सोमवारी मध्यरात्रीपासून पुणे आणि पिंपरी चिंचवडसह संपूर्ण जिल्ह्यात पुढील 15 दिवस पुन्हा लॉकडाऊन करण्यात येणार आहे. यापूर्वी पुन्हा लॉकडाऊन करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनीही दिला होता. कोरोनाचा धोका टळलेला नाही. तरीही पुण्यात काही नागरिक कोणत्याही कारणाशिवाय घराबाहेर पडत आहेत. विशेष म्हणजे अनेक नागरिक मास्क न वापरता खुलेआम फिरत असल्यामुळे अशीच परिस्थिती कायम राहिल्यास प्रशासनाला आणखी कडक भूमिका घ्यावी लागेल. वेळप्रसंगी पुन्हा लॉकडाऊन घोषित करावा लागेल, असा इशारा चार दिवसापूर्वी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिला होता.

त्याचबरोबर पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी अधिकाऱ्यांना कोरोना पीडितांचा आकडा आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी अधिक जबाबदारीने काम करा, अशा सूचना दिल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणासाठी नियोजन करण्याच्या दृष्टीने 9 जुलैला जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना सचूना दिल्या.

Leave a Comment