गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा हिरमोड होण्याची शक्यता


मुंबई – गणेशोत्सव हा सण कोकणात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि आपल्या लाडक्या बाप्पाचे स्वागत त्याचबरोबर त्या बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यासाठी चाकरमानी खूपच उत्सुक असतात. तसेच गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते.

दरम्यान जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी परजिल्ह्यांतून येणाऱ्या गणेशभक्तांना ७ ऑगस्टपर्यंतच सिंधुदुर्गात प्रवेश देण्याची भूमिका घेतली आहे. सिंधुदुर्गात ७ ऑगस्टपर्यंत आल्यानंतर विलगीकरणात राहणे बंधनकारक करण्याबरोबरच ई-पास नसलेल्या वाहनांना प्रवेश नाकारण्याचे बैठकीत ठरविण्यात आले. पण या निर्णयावर अंतिम मोहर लागलेली नाही. या संदर्भातील अंतिम निर्णय पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शांतता समितीच्या बैठकीत घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून कोरोनामुळे अनेक सणदेखील साधेपणात अथवा रद्द करण्यात आल्यामुळेच राज्यातील गणेशोत्सव मंडळांनी यंदा साधेपणात सण साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी बुधवारी संध्याकाळी रत्नागिरी जिल्ह्यातील लॉकडाऊनला आणखी एक आठवड्याची मुदतवाढ देत असल्याचा आदेश काढल्यानंतर जिल्ह्याच्या विविध भागांत त्याचे तीव्र पडसाद उमटले. जनतेच्या जोरदार विरोधामुळे गुरुवारी हा आदेश लक्षणीय प्रमाणात शिथिल करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या नवीन आदेशानुसार जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायतींच्या हद्दीतील दुकाने खुली ठेवण्यासाठी आराखडा मंजुरीबाबतचे अधिकार प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार एक दिवसाआड डाव्या-उजव्या बाजूची दुकाने खुली राहतील. संपूर्ण बाजारपेठ रविवारी बंद राहणार आहे.

केंद्र आणि राज्य शासनाच्या लॉकडाऊन शिथिलीकरणानुसार १ जुलैपासून जिल्ह्यतील व्यवहार आणखी खुले होणे अपेक्षित होते. पण, जिल्ह्यात कोरोनाचे सामूहिक संक्रमण होत असल्याची लक्षणे दिसत असल्याचे कारण देत ‘मिशन ब्रेक द चेन’ ही मोहीम राबवण्याचा निर्णय राज्याचे उच्च शिक्षण व तंत्रज्ञानमंत्री उदय सामंत यांनी ३० जून रोजी पत्रकार परिषदेत जाहीर केला. त्या वेळी ८ जुलैपर्यंत जिल्ह्यातील लॉकडाऊन वाढवण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. बुधवारी ती मुदत संपत असल्यामुळे जिल्हाधिकारी मिश्रा यांनी संध्याकाळी उशिरा आदेश जारी करत आणखी एक आठवडा लॉकडाऊन राहणार असल्याचे जाहीर केल्यानंतर विविध समाजमाध्यमांवर तीव्र विरोधी प्रतिक्रिया उमटल्या.

सततच्या मुदतवाढीमुळे जिल्ह्यातील व्यापार, उद्योगाला मोठा फटका बसला असून कष्टकरी वर्गाचे हाल होत असल्याच्या भावना त्यातून व्यक्त होत आहेत. दरम्यान या लोकभावनेची राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेखर निकम यांनी सर्वात प्रथम दखल घेत हा विषय थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे नेऊन दाद मागण्याचा विचार जाहीर केला. त्यापाठोपाठ देवरुखची व्यापारी संघटना आणि भाजपच्या तालुका पदाधिकाऱ्यांनीही मुदतवाढीला विरोध केला.

तर दुसरीकडे या प्रकरणी गुन्हे दाखल झाले तरीही दुकाने उघडण्यात येतील, असे चिपळूणचे माजी नगरसेवक शिरीष काटकर यांनी आव्हान दिले. गुहागरचे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनीही विरोधाची भूमिका घेतली, तर मंत्री सामंत यांनी प्रशासनाला धोरण शिथिल करण्याची सूचना केली.

तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत व्यापाऱ्यांचे म्हणणे त्यांच्यापर्यंत भाजप जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी मांडले. लांजा-राजापूर तालुक्यातील व्यापारी वर्गासह इतर घटकांकडूनही विरोधाची भावना जोरदारपणे व्यक्त झाली. अखेर या जनक्षोभापुढे नमते घेत जिल्हा प्रशासनाने २४ तासांत सुधारित आदेश जारी केला.

Leave a Comment