यंदाचा आशिया कप रद्द, जून 2021 मध्ये होण्याची शक्यता!

आशिया क्रिकेट काउंसिलने (एसीसी) आशिया कपचे आयोजन पुढील वर्षी जूनमध्ये करण्याची योजना असल्याची माहिती दिली आहे. यासाठी वेळापत्रक तपासून पुढील आयोजन केले जाईल. ही स्पर्धा या वर्षी सप्टेंबर महिन्यात होणार होती. पाकिस्तान याचे आयोजन न्यूट्रल देशात करणार होता. मात्र सध्या कोरोना व्हायरस महामारीमुळे ही स्पर्धा रद्द करण्यात आली आहे.

आशिया क्रिकेट काउसिंलने दिलेल्या माहितीनुसार, प्रवासावर असलेले निर्बंध, देशातील क्वारंटाईन संदर्भातील नियम, आरोग्य संबंधी धोका आणि सोशल डिस्टेसिंगच्या नियमांमुळे आशिया कपचे आयोजन करणे एक मोठे आव्हान होते. याशिवाय स्पर्धेत भाग घेणारे खेळाडू, सपोर्ट स्टाफ, कमर्शल पार्टनर आणि चाहते यांची आरोग्य सुरक्षा हे देखील मोठे कारण आहे.

एसीसीने म्हटले की, सुरक्षितरित्या स्पर्धेचे आयोजन करणे ही आमची प्राथमिकता आहे. बोर्डाला आशा आहे की पुढील वर्षी म्हणजेच 2021 मध्ये या स्पर्धेचे आयोजन केले जाईल. एसीसी सध्या जून 2021 मध्ये या स्पर्धेसाठी विंडो शोधत आहे.

दरम्यान, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने स्पोर्ट्स तकच्या इन्स्टाग्राम लाईव्ह सेशनमध्ये बोलताना कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे यंदाच्या आशिया कपचे आयोजन रद्द करण्यात आल्याची माहिती माहिती दिली होती.

Leave a Comment