कल्याण-डोंबिवलीत क्वारंटाईन असलेल्यांवर 'या'मुळे दाखल होणार गुन्हा - Majha Paper

कल्याण-डोंबिवलीत क्वारंटाईन असलेल्यांवर ‘या’मुळे दाखल होणार गुन्हा


कल्याण : एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत असतानाच दुसरीकडे लॉकडाऊन असताना देखील खरेदीसाठी नागरिक गर्दीही करत आहेत. कल्याण-डोंबिवलीला कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढ होत असल्यामुळे याआधीच कंटेंटमेंट झोन म्हणून जाहिर करण्यात आले आहे. त्याचबरोबर कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेत अनेकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. पण, क्वारंटाईनमध्ये असलेले लोकही घराबाहेर फिरताना दिसत असल्यामुळे अशांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल, असा कडक इशारा कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने दिला आहे.

याच महिन्याच्या दोन तारखेपासून लॉकडाऊन असताना रुग्णांची सख्या कमी होत नसल्यामुळे दहा दिवसाचा पुन्हा लॉकडाऊन घेण्यात आला आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता महानगरपालिकेकडून ज्यांच्या घरात सुविधा आहेत, अशा रुग्णांना होम क्वारंटाईन केले आहे. पण या सुविधेचा काही रुग्ण गैरफायदा घेत नजर चुकवून घराबाहेर फिरत असल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. असे रुग्ण सोसायटीच्या सदस्यांना न जुमानता बाहेर पडत असल्याने इतरांनाही कोरोनाची लागण होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात असलेल्या नागरिकांना आपआपल्या घरात होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. पण असे नागरिक सोसायटीच्या सदऱ्यांना न जुमानता सर्रास घराबाहेर फिरत असल्याचे पालिका आयुक्तांच्या निदर्शनास आल्याने क्वारंटाईन केलेले जे नागरिक घराबाहेर पडतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी पोलिसांना दिले आहेत. दरम्यान, पालिकेने कडक भूमिका घेतल्याची माहिती केडीएमसी आरोग्य विभाग अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी दिली.

Leave a Comment