या आठवड्यात पुण्यातील ‘हे’ दोन उड्डाणपूल होणार जमिनदोस्त


पुणे – पुणे विद्यापीठ चौकातील दोन उड्डाणपूल शहरातील मेट्रो मार्गासाठी जमिनदोस्त करण्यात येणार आहेत. पूल पाडण्याचे आदेश पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून देण्यात आले आहेत. यामध्ये गणेशखिंड रस्त्यावरील विद्यापीठ चौक आणि ई स्क्वेअर चौकातील उड्डाणपूलाचा समावेश आहे.

पीएमआरडीएने हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान मेट्रो प्रकल्पाचे काम हाती घेतले असून ही मेट्रो गणेशखिंड रस्त्यावरून जाणार आहे. या प्रकल्पासाठी या रस्त्यावर पुणे विद्यापीठ आणि ई स्क्वेअर चौकातील उड्डाणपूल अडथळा ठरत होता. अखेरीस हा पूल पाडण्याबाबतचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. दोन्ही पूल पाडण्यासाठी २५ दिवसांचा कालावधी लागणार असून याकाळात नागरिकांना वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

दरम्यान, दोन्ही पूल पाडल्यानंतर वाहतुकीसाठी नवा दुमजली उड्डाणपूल उभारला जाणार आहे. या उड्डाणपूलासाठी तब्बल २६० कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. नवा पूल उभारण्यासाठी टाटा-सिमेन्स कंपनीला मान्यता मिळाल्याचे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Comment