संशोधकांचा दावा ; कोरोनाच्या विषाणूंचा हवेतच नाश करणारे एअर फिल्टर तयार


नवी दिल्ली – संपूर्ण जगावर ओढावलेले कोरोनाचे संकट गडद होत असतानाच हवेतच कोरोनाचे विषाणू मारण्यास सक्षम असणारे एअर फिल्टर तयार केल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. हवेतील कोरोनाचे विषाणू वेगळे करुन त्यांना हे फिल्टर नष्ट करते, असा संशोधकांनी दावा केला आहे. बंद ठिकाणी म्हणजेच शाळा, रुग्णालये, कार्यालयांशिवाय विमानांमध्ये कोरोनाचा फैलाव रोखण्यात संशोधकांच्या नव्या शोधामुळे मदत मिळू शकते. या अभ्यासाची माहिती मटेरिअल्स टुडे फिजिक्स या जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.

अभ्यासात देण्यात आलेल्या माहितीनुसार, या एअर फिल्टरमधून एकदा गेलेल्या हवेतून ९९.८ टक्के कोरोना विषाणू मारले गेले. निकेल फोमपासून हे उपकरण तयार करण्यात आले असून २०० डिग्री सेल्सियसपर्यंत ते तापते. त्यामुळे अँथ्रॅक्स आजारासाठी कारणीभूत ठरणाऱ्या ९९.९ टक्के जिवाणूंचा हे उपकरण नाश करते.

विमानतळ तसेच विमानांमध्ये, ऑफिस, इमारती, शाळा आणि क्रूझ अशा ठिकाणी हे फिल्टर कोरोनाचा संसर्ग रोखण्यात उपयोगी असेल, असे अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ ह्यूस्टनचे अभ्यासातील सह-लेखक झिफेंग रेन यांनी म्हटले आहे. या फिल्टरची कोरोनाचा संसर्ग रोखण्याची क्षमता समाजासाठी फार उपयोगी होईल असेही त्यांनी म्हटले आहे.

जवळपास तीन तास कोरोनाचे विषाणू हवेत जिवंत राहत असल्याने एक असा फिल्टर तयार करण्याची आमची योजना होती, विषाणूंना जो लवकरात लवकर संपवेल आणि जगभरात पुन्हा एकदा कामकाज सुरु करण्याच्या दृष्टीने बंद ठिकाणी विषाणूंवर नियंत्रण मिळवेल, असे संशोधकांनी सांगितले आहे.

सर्वात आधी शाळा, रुग्णालये, विमान, कार्यालयीन इमारती, आरोग्य विभाग आणि सार्वजनिक ठिकाणी हे उपकरण देण्यात येईल, अशी माहिती एअर फिल्टरच्या निर्मितीसाठी युनिव्हर्सिटी ऑफ ह्यूस्टनसोबत भागीदार असणारे मेडिकल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कंपनी मेडिस्टारचे गॅरेट पील यांनी दिली आहे. अभ्यासानुसार, ७० डिग्री सेल्सिअस तापमानात कोरोनाचे विषाणू टिकत नसल्यामुळे २०० डिग्रीपर्यंत एअर फिल्टरचे तापमान वाढवून कोरोनाचे विषाणू संपवले जाऊ शकतात.

रिपोर्टनुसार, हे उपकरण तयार करणारे संशोधक याचे डेस्कटॉप मॉडेलही तयार करण्याच्या दृष्टीने काम करत आहेत. जेणेकरुन मोठ्या व्यावसायिक कार्यालयांमध्ये हे मॉडेल्स वापरली जाऊ शकतात. कर्मचाऱ्यांना शेजारील हवा कोरोनामुक्त ठेवण्यात हे मॉडेल मदत करेल.

हे फिल्टर तयार करणाऱ्या वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, एसीचा वापर ज्या ठिकाणी केला जातो तेथील हवेत कोरोनाचे विषाणू बराच वेळ जिवंत असतात. अशा परिस्थितीत डेस्कटॉप फिल्टर मॉडेल जर विकसित केले, तर जगभरात बंद पडलेली कार्यालये सुरु करण्यात त्याचबरोबर व्यवसाय क्षेत्राला पुन्हा एकदा गती मिळण्यात यश मिळेल, असा विश्वास देखील व्यक्त केला आहे.

Leave a Comment