65 वर्षीय पोस्टमनने कामाने जिंकले मन, नेटकऱ्यांनी केली पद्मश्री देण्याची मागणी

तामिळनाडूचे 65 वर्षीय डी. सिवन हे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. सिवन हे पोस्टमन होते व ते मागील आठवड्यातच निवृत्त झाले आहेत. सोशल मीडियावर लोक सरकारला सिवन यांना पद्मश्री देण्याची मागणी करत आहेत. पोस्टमन असलेले सिवन महिन्याला 12 हजार रुपयांच्या पगारात लोकांपर्यंत पत्र पोहचविण्यासाठी दररोज 15 किमी डोंगर आणि जंगलातील रस्त्याने जात असे. या दरम्यान त्यांचा सामना अनेकदा जंगली प्राण्यांशी देखील झाला. मात्र खडतर रस्ता आणि प्राण्यांना त्यांच्या कामात अडथळा आणता आला नाही.

आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांनी सिवन यांचा फोटो ट्विटरवर शेअर करत लिहिले की, पोस्टमन डी. सिवन हे दररोज 15 किमी चालत कुनूरच्या घनदाट जंगलात हत्ती, अस्वल सारख्या प्राण्यांचा सामना करत लोकांपर्यंत पत्र पोहचवत असे. मागील 30 वर्ष ते हेच काम करत असे. मागील आठवड्यात ते निवृत्त झाले.

सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल होत आहे. डी. सिवन यांच्या ही कथा नक्कीच अनेकांना प्रेरणा देत आहे. एका युजरने लिहिले की, मी 2018 साली त्यांची मुलाखत घेतली होती. त्यांना भारतरत्न मिळायला हवे. कमीत कमी पद्मश्री पुरस्काराने त्यांचा सन्मान व्हावा. यानंतर अनेक युजरने राष्ट्रपती भवनला टॅग करत त्यांना पद्मश्री देण्यात यावा अशी प्रतिक्रिया दिली.

Leave a Comment