यापुढे सॅमसंगच्या मोबाईलसोबत मिळणार नाही मोफत चार्जर ?


नवी दिल्ली: स्मार्टफोन निर्मितीत अग्रगण्य असलेली सॅमसंग कंपनी लवकरच आपल्या ग्राहकांना धक्का देण्याची शक्यता असून सध्या सॅमसंगकडून स्मार्टफोनसोबत मिळणारा मोफत चार्जर न देण्याबद्दल विचार सुरू असल्यामुळे सॅमसंगच्या नव्या मोबाईलसोबत मोफत चार्जर मिळणार नाही, असे चित्र सध्यातरी समोर आले आहे. यासंदर्भातील वृत्त सॅमसंगशी संबंधित माहिती देणाऱ्या सॅममोबाईल नावाच्या संकेतस्थळाने वृत्त दिले आहे.

सॅममोबाईल संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार काही स्मार्टफोनसोबत पुढील वर्षापासून चार्जर न देण्याची योजना सॅमसंगकडून आखली जात आहे. जर सॅमसंगने असा निर्णय घेतला तर कंपनीचे फोन पहिल्यांदाच चार्जरशिवाय विकले जातील. यामागे पूर्णपणे आर्थिक विचार असल्याचे म्हटले जात आहे. जगातील सर्वात मोठ्या स्मार्टफोन निर्मिती कंपन्यांमध्ये सॅमसंगची गणती होते. दरवर्षी कोट्यावधी फोन्सची कंपनी विक्री करते. या फोनसोबत चार्जर न दिल्यास कंपनीला आर्थिक फायदा होईल. त्यामुळे फोनची किंमत कमी होऊन त्याचा फायदा ग्राहकांना देता येईल, असा विचार कंपनीकडून सुरू आहे.

जगभरात सध्याच्या घडीला विकल्या जाणाऱ्या स्मार्टफोन्सचे चार्जिंग पोर्ट्स जवळजवळ एकसारखेच असतात. यूएसबी-सी पोर्ट चार्जिंग पोर्ट्सचे फोन सगळ्याच कंपन्या तयार करतात. याच मुद्द्याचा फायदा घेण्याच्या तयारीत सॅमसंग आहे. चार्जरशिवाय फोन विकण्याच्या विचारात असलेली सॅमसंग ही पहिली कंपनी नाही. आयफोन १२ ची सीरिज अॅपलकडूनही विना चार्जर बाजारात लॉन्च करण्याचा विचार सुरू आहे.

सध्या बाजारपेठे उपलब्ध असलेल्या सगळ्याच फोनचे चार्जिंग पोर्ट्स जवळपास एकसारखेच असल्यामुळे एक चार्जर अनेक मोबाईलसाठी वापरला जाऊ शकतो. सॅमसंगकडून याचाच फायदा घेण्याचा विचार सुरू आहे. आयफोन १२ सीरिज चार्जरशिवाय आणण्याच्या विचारात अॅपल असल्यामुळे सॅमसंगदेखील अशाच प्रकारचा निर्णय घेऊ शकते.

Loading RSS Feed

Leave a Comment